अशोक चव्हाण नव्या घोटाळ्यात फसणार

chavan
मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पेड न्यूज प्रकरणातून अद्यापी बाहेर आले नसताना अन्य एका घोटाळ्यात गळ्यापर्यंत अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नॅशनल हेराल्ड, कौमी एकता या वर्तमानपत्रांचे संचालन करणार्‍या असोसिएटेड जर्नल कंपनीला मुंबईतील जमीन लिज देण्याच्या प्रकरणात व्याजमाफी दिल्यावरून चव्हाण यांच्याविरोधात नव्या वादाची सुरवात होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. वरील कंपनी गांधी परिवाराच्या मालकीची आहे. या जागी पुर्ननिर्माणाचे काम जोरात सुरू असून ते डिसेंबर १४ पर्यंत पूर्ण होत असल्याचेही समजते. या जागेची आजची किमत २५० कोटी रूपये आहे.

या संबंधी माहिती अधिकार कायद्याच्या खाली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अर्ज केला होता. त्या नुसार मिळालेल्या माहितीनुसार बांद्रा येथील सुमारे ४२०० चौरस मीटर जागा वरील संस्थेला १९८३ साली लीजने देण्यात आली होती. त्यावेळी अंतुले मुख्यमंत्री तर अशोक चव्हाण महसूल मंत्री होते. या जागेचा वापर वर्तमानपत्र कार्यालय आणि नेहरू संग्रहालयासाठी करावयाचा होता. मात्र ही जागा त्यासाठी कधीच वापरली गेली नाही. तरीही सरकारने ही जागा परत घेतली नाही. या जागेच्या लिजपोटी भरावयाची रक्कम संस्थेने भरली नव्हती. या रकमेचे ३ कोटी ७५ लाख रूपये व्याज महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी २००१ साली माफ केले शिवाय संस्थेला लीज वाढवून देण्यात आले असल्याचे माहितीत उघड झाले आहे. या प्रकरणात अशोक चव्हाण चांगलेच अडकले असल्याने त्यांच्याविरोधात केस दाखल होऊ शकते असे सांगितले जात आहे.

Leave a Comment