हिरवे खत : ग्लिरिसीडिया

glirisidia
रासायनिक खतांचे दुष्परिणाम आता सर्वांच्याच लक्षात यायला लागले आहेत आणि त्यांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे अशी जागृतीही निर्माण होत आहे. पण सेंद्रीय खत म्हणजे नेमके काय? या खतांमध्ये प्रामुख्याने शेणखत, सोनखत, डुकरांच्या लेंड्या, शेळ्या-मेंढ्यांच्या लेंड्या, कुक्कुटपालन केंद्रातील भुस्सा अशा प्राण्यांच्या विष्ठा आणि शेणापासून तयार झालेल्या खतांचा समावेश होतो. त्याशिवाय इतरही काही नैसर्गिक आणि सेंद्रीय खते आहेत. त्यामध्ये कंपोस्ट खताचा समावेश होतो. या प्रकारच्या खतात खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने काडी-कचरा तसेच शेतामध्ये पिकांची काढणी झाल्यानंतर राहिलेले पिकांचे अंश म्हणजे ज्वारीची धसकटे, गव्हाचे काड, तुरांट्या, सूर्यङ्गुलाच्या काड्या, खरकटे अन्न यांचा वापर केला जातो. त्याशिवाय लिंबोळीचा खत सुद्धा उपयुक्त ठरत असतो. कडुलिंबाचे झाड तर शेतीसाठी ङ्गार उपयुक्त आहे. लिंबोळीचा अर्क पिकांवर जंतूनाशक म्हणून उपयुक्त ठरतो. हा अंश काढल्यानंतर राहणारी लिंबोळीची पेंड खत म्हणून अतिशय उपयुक्त असते. त्याशिवाय आपण आणखी काही प्रकारच्या खतांना विसरलो आहोत. तो प्रकार म्हणजे हिरवळीचा खत.

हिरवळीचा खत म्हणजे शेतामध्ये काही पिके पेरली जातात आणि ती कोवळी असतानाच शेतामध्ये गाडली जातात. अशा हिरवळीच्या खतासाठी प्रामुख्याने तागाचा वापर केला जातो. तागाचे सव्वा महिन्याचे पीक शेतामध्ये गाडले तर ते लवकर कुजते आणि त्याचा खत म्हणून उत्तम वापर होऊ शकतो. अशा तर्‍हेची ही सारी नैसर्गिक खते तर आहेतच. पण सध्याच्या काळात सर्वात उपयुक्त ठरलेले गांडूळ खत हे सुद्धा उत्तम नैसर्गिक खत आहे. निसर्गाने आपल्याला ङ्गुकटात खते दिलेली आहेत. आपल्याला ती माहीत नाहीत किंवा माहीत असली तरी रासायनिक खताच्या अतिरेकी प्रचारामुळे त्या खतांचा आपल्याला विसर पडला आहे. अशा हिरव्या खतांमध्ये ग्लिरिसीडियाचा समावेश होतो. ग्लिरिसीडियाला मराठीमध्ये गिरीपुष्प असे म्हणतात. ते एक झाड असते. ते साधारणपणे दहा ते बारा ङ्गूट उंच होते. काही वेळा त्यापेक्षाही जास्त उंच होते. त्या झाडाचा पाला नत्र खताचा पुरवठा करण्याचे एक मोठे साधन आहे. या झाडाची पाने शेतामध्ये टाकली की ती काही दिवसांनी आपोआप कुजतात आणि जमिनीला नत्रखताचा मोठा पुरवठा होतो. या पानांमध्ये नत्राचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. त्यामुळे आपल्या शेताच्या बांधावर ग्लिरिसीडियाची झाडे लावावीत.

त्यांचा पालापाचोळा दर तीन महिन्यांनी तोडावा आणि शेतामध्ये टाकावा. कसलेही पैसे न देता आपोआप यूरीयाचा पुरवठा करणारी ही खताची ङ्गॅक्टरीच आहे. दर तीन महिन्यांनी छाटणी करून याच्या कोवळ्या ङ्गांद्या आणि पाने काढून त्यातली पाने शेतामध्ये आणि काड्यांचे छोटे छोटे तुकडे करून ते कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकले की, त्यांचाही आपोआप खत तयार होतो. या झाडाला पाणी द्यावे लागत नाही. बांधावर ते आपोआप येते. दुष्काळप्रवण भागामध्ये यशस्वी झालेले ते भरपूर हिरवे राहणारे झाड ठरलेले आहे. ते बांधावर लावताना वार्‍याची दिशा बघून लावावे. वारा ज्या दिशेने वहात असेल त्याच्या विरुद्ध दिशेला बांधावर ही झाडे लावली की, एक तर वाराही रोखला जातो. वारा रोखल्यामुळे जमिनीतली ओल टिकते. हा तर ङ्गायदा आहेच, पण वार्‍याची दिशा बघून झाड लावले की, त्याचा पाला आपोआप आपल्या शेतामध्ये पडतो.

ग्लिरिसीडिया किंवा गिरीपुष्प याची रोपे शासकीय वनखात्याच्या किंवा कृषी खात्याच्या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध होतात. न झाली तरी शक्य असतील तेथून ती आणावीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची काडी जरी व्यवस्थित लावली तरी त्याचे झाड तयार होऊ शकते. असे हे सोपे आणि निसर्गाने ङ्गुकट दिलेले हिरवळीचे उत्तम खत आहे. एवढे खत दिले म्हणजे शेती छान पिकते, असा काही दावा या ठिकाणी करायचा नाही. परंतु नत्राने भरपूर युक्त असलेला हा पाला कसलेही पैसे न मोजता मिळत असेल तर जेवढा केवढा मिळतो तेवढे आपले रासायनिक खताचे पैसे वाचणार आहेत की नाही ? कारण आपल्याला शेवटी शेतातल्या पिकांसाठी होणारा खर्च कमीत कमी करायचा आहे. मग जेवढा होईल तेवढा खत ङ्गुकटचा मिळत असेल तर तो आवर्जून वापरला पाहिजे. जेवढा मिळेल तेवढी तरी बचत होणारच आहे आणि या बचतीसाठी आपल्याला ङ्गार काही करायचे नाही. आयतेच झाड येते. त्याच्यावर रोग-किडी पडत नाहीत. एकदा ते झाड लागले की वाढत राहते. आपल्याला त्याच्यासाठी काही ङ्गार मेहनत करण्याची गरज नाही.

अशाच पद्धतीने तागाचेही खत मिळत असते. ताग किंवा बोरू पेरून तो महिन्याचा झाला की, त्याच्या काड्या कोवळ्या असेपर्यंत ते जमिनीत गाडावे. त्यासाठी बळीराम नांगराने हलकेच नांगरावे आणि त्यामुळे तयार झालेल्या लहान लहान सर्‍यांमध्ये ताग कापून टाकावा. वर माती लोटली गेली आणि एखाद दुसरा पाऊस पडला की, ताग कुजून जातो. तागामध्ये सुद्धा नत्राचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे कसलाही खर्च न करता आपल्या शेतातल्या मातीमध्ये पोषण द्रव्ययुक्त भर पडते. तिच्यामुळे जमिनीचा मगदूर सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि तागानंतर घेतलेले पीक सुद्धा उत्तम येते. अशा रितीने बाजारातून आयते तयार आणि महागामोलाचे रासायनिक खत आणून ते वापरण्यापेक्षा हे हिरवळीचे खत वापरणे अधिक सयुक्तिक, उपयुक्त आणि किङ्गायतशीर ठरते.