‘चंद्रभागे’त स्नानासाठी भाविकांना मुबलक पाणी

chandrbhaga
पंढरपूर – उजनी धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावलेला असताना आषाढी एकादशीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, या निर्णयामुळे भाविकांना चंद्रभागा नदीत स्नासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

उजनी धरणात वजा २३ टक्के पाणीसाठा आहे , उपलब्ध पाण्यापैकी यात्रेसाठी १ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पाणी पातळी खाली गेल्याने यात्रेदरम्यान कालव्यातून पाणी पुढे जाणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. त्यात १९ जून रोजी येथील संत तुकाराम भवन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करून शासनाकडे मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत धरणातून पाणी सोडण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे भाविकांना यात्रा काळात चंद्रभागा नदीत स्नानासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, पुढच्या एक दोन दिवसात धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. आषाढी यात्रेसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर पाणीपातळी खालावणार आहे.

Leave a Comment