ग्लोबल वॉर्मिंग; ‘पेंग्विन’चे अस्तित्व धोक्यात

penguine
वॉशिंग्टन – ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ जागेत आढळणार्‍या पेंग्विन्सची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून या शतकाच्या अखेरीस निम्म्याहून अधिक पेंग्विन्स नष्ट होण्याचा धोका असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या मॅसाच्युसेटस्मधील वूडस् होल ओशनोग्राफिक संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात भविष्यात पेंग्विनचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगचा विपरीत परिणाम होऊन ध्रुवीय प्रदेशातील बर्फ सातत्याने वितळत आहे. यामुळे जागतिक तापमानातही वाढ झाली आहे. या बदलांमुळे समुद्रात राहणार्‍या सजीवसृष्टीतील अनेक जलचर नष्ट होत असून याच्या परिणामी भविष्यात पेंग्विनची संख्याही कमी होऊ शकते, असे या अभ्यासाचे प्रमुख डॉ. स्टिफानी जेनौव्रीयर यांनी म्हटले आहे .

पेंग्विनचा अधिवास असलेली बर्फाची पठारे सातत्याने वितळत आहेत. तसेच या पक्ष्यांचे खाद्य असलेल्या समुद्रातील जलचरांचीही संख्या कमी होत असल्यामुळे या शतकाच्या अखेरीस जगभरातील पेंग्विन्सच्या दोन तृतीयांश वसाहतींमधील निम्म्याहून अधिक पेंग्विन्स नष्ट होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार २0४0 पर्यंत पेंग्विन्सच्या संख्येत सामान्य वाढ होताना दिसेल. त्यानंतर हवामान बदलातील प्रतिकूल परिणामांमुळे पेंग्विन्सच्या संख्येत घट होण्यास सुरुवात होईल. हे चक्र २0८0 पर्यंत सुरूच राहील. त्यामुळे २१00 पर्यंत पेंग्विन्सची संख्या आता असलेल्या एकूण संख्येपेक्षा निम्म्याहून कमी असेल, असे स्टिफानी यांनी म्हटले आहे . नैसर्गिक अन्नसाखळीवर परिणाम होत आहे. यामुळे सृष्टीचे संतुलन बिघडण्याचा धोका लक्षात घेता आताच योग्य ती पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment