सेक्युलॅरिझमची कुचेष्टा

secur
कॉंग्रेसच्या पराभवामागे नेमके काय कारण आहे याचा अजून तरी पत्ता लागलेला नाही कारण कॉंग्रेसच्या नेत्यांना ते शोधायचेच नाही. काल एका वृत्तवाहिनीवर मनिष तिवारी यांनी कॉंग्रेस नेते यापुढे काय करण्याची योजना आखत आहेत याची दिेशा सांगत होते. ते म्हणत होते की, हे सरकार काही चुका करीलच. मग आमचे सारे काही सुरळीत होईल. याचा अर्थ कॉंग्रेस पक्षाकडे आपल्या पराभवापासून धडा घेऊन काही फेररचना करण्याची योजना नाही.भाजपा सरकारने चुका कराव्यात हीच कॉंग्रेसची योजना आहे. अशा विचारांमुळेच ते पराभवाच्या खर्‍या कारणाचा शोध घेत नाहीत. पण खरी कारणे जनतेला माहीत आहेत. गेल्या महिन्यात एका मुस्लिम खासदाराने पराभवाचे खरे कारण सांगितले होते. कॉंग्रेस पक्षाने मुस्लिम मतांवर नको इतका भर दिल्याने सारा हिंदू समाज आपोआपच भाजपाच्या मागे उभा राहिला असे त्याने म्हटले होते. आता ए. के. अँटनी तसेच बोलत आहेत. त्यांनीही मुस्लिम समाजाच्या अनुनयामुळेच आपल्याला पराभव पत्करावा लागला असल्याचे मान्य केले आहे. एवढे असूनही महाराष्ट्रातले सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन त्यांचा अनुनय करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे झालेल्या चुकीपासून ते काही धडा घ्यायला तयार नाहीत. आजवर काही फुटकळ कार्यकर्त्यांनी आणि काही माजी आमदारांनी अशाच कारणांच्या मुळाला हात घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्याबद्दल शिक्षा भोगावी लागली. पण आता मात्र ए.के. ऍन्टनी आणि दिग्विजयसिंग या दोघांनी पराभवाच्या सत्य कारणांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची पक्षश्रेष्ठी नावाच्या यंत्रणेला दोन निर्णायक टोले बसले आहेत.

दिग्विजयसिंग यांनी राहुल गांधी यांच्यात सत्ताधारी म्हणून काम करण्याची मानसिकता नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात, ते सत्ताधारी नेते होऊ शकत नाहीत हे जनतेने याच्याआधीच जाणलेले आहे. म्हणून दिग्विजयसिंग यांच्यापेक्षा ऍन्टनी यांनी केलेला घरचा आहेर जास्त मार्मिक आणि वर्मी लागणारा आहे. कॉंग्रेसचे नेते आपला पक्ष काही तत्वांवर उभा असल्याचे सांगत असतात. पण ही तत्वे नेमकी कोणती याची निश्‍चित व्याख्या ते करत नाहीत. आपला पक्ष लोकशाहीवादी आहे असे कोणीही म्हणू शकतो परंतु कॉंगे्रसने लोकशाही म्हणता म्हणता घराणेशाही स्वीकारलेली आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणून लोकशाहीचे काय केले होते हे सर्वांना माहीत आहे. गेली ११ वर्षे या पक्षाचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. म्हणजे या लोकशाहीवादी पक्षाला आपला अध्यक्षही बदलता येत नाही.

कॉंग्रेस पक्ष समाजवादी आहे असे पूर्वी म्हटले जायचे. परंतु १९९१ साली पक्षाने समाजवादही सोडून दिला. तेव्हा पक्ष समाजवादी आहे असे म्हणण्यातही काही अर्थ राहिलेला नाही. आता या पक्षाने भांडवलशाहीचाच मार्ग स्वीकारला आहे. कॉंग्रेसने गांधीवादाला तर मागेच सुट्टी दिलेली आहे. आता कॉंग्रेसच्या नेत्यांना असे जाणवत आहे की आपला खरा मुकाबला भाजपाशी आहे. तेव्हा हा मुकाबला वैचारिक व्हावा यासाठी कॉंग्रेसचे नेते भाजपावर जातीयवादाचा आरोप करतात आणि आपला पक्ष मात्र सेक्युलर आहे असे आवर्जुन सांगतात. आता कॉंग्रेसला सांगायला सेक्युलरवाद हे एकच तत्व शिल्लक राहिले होते आणि त्यामुळे त्याचाच उद्घोष वारंवार केला जात होता. आपल्या देशात सेक्युलर या कल्पनेची फार मोडतोड झालेली आहे आणि वारंवार वापरून हा शब्द गुळगुळीत झाल्यामुळे त्याचा खरा अर्थही लोक विसरून गेले आहेत. कॉंग्रेस पक्षाने सेक्युलॅरिझमचा उद्घोष केला खरा परंतु त्याच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंचा अधिक्षेप आणि अल्पसंख्य मुस्लीम मतदारांचे लांगुलचालन सुरू केले. असे केले की मुस्लिमांची मते मिळतात आणि ती एकदा पदरात पाडून घेतली की अन्य खटपटी लटपटी करून थोडीबहुत अन्य मते मिळवून सत्तेवर येता येते असे गणित कॉंग्रेसचे नेते मांडत होते. म्हणून सातत्याने मुस्लिमांना खुष करण्यासाठी घोषणा आणि वल्गना करणे हीच त्यांची राजनीती होऊन गेली होती. तोंडाने सेक्युलॅरिझमची भाषा बोलून इत्तेहादूल मुसलमीन आणि केरळातील मुस्लीम लीगशी युती केली तरी काही बिघडत नाही असा त्यांचा दावा होता.

ए.के.ऍन्टनी यांनी कॉंग्रेसचे हे धोरण चुकले असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. आपण मुस्लिमांची एवढी मनधरणी करायला लागलो की त्यामुळे बहुसंख्य हिंदू मतदार दुखावले गेले असे ऍन्टनी म्हणतात. खरे म्हणजे ही गोष्ट पूर्वीच कळायला पाहिजे होती. ती मागे कळली नाही ही चूक झाली पण निदान आता तरी ती कळावी पण तसेही काही दिसत नाही. म्हणून महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे नेते मुस्लिमांची मनधरणी करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम आरक्षणाची युक्ती योजत आहेत. आताही महाराष्ट्रातले मतदार या मुस्लिम अनुनयाला येत्या विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर देणार आहेत. कारण याही सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा त्याच जुन्या युक्त्या अवलंबायला सुरूवात केली आहे. या गोष्टींचा आता जनतेला आणि नव्या मतदारांना उबग आला आहे. पण कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बथ्थड डोक्यात ते शिरत नाही.

Leave a Comment