राहुल गांधींची झाकली मूठ

rahulgandhi
कॉंग्रेस पक्षाला सध्या फार वाईट दिवस आले आहेत. केन्द्रात या पक्षाच्या पराभवाच्या कारणावरून वाद जारी आहेत. ती कारणे नेमकेपणाने पुढे येत नाहीत पण त्या कारणांवरून गांधी घराण्यावर कसलाही दोष येऊ नये यासाठी अनेक निष्ठावानांचा आटापिटा चालला आहे. पण आता काही निष्ठावंतच खर्‍या कारणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला लागले आहेत. त्यामुळे आजवर पक्षाच्या पराभवाचे खापर सोनिया किंवा राहुल गांधी यांच्या डोक्यावर फुटू नये म्हणून सतत काळजी घेणार्‍या कॉंग्रेस नेत्यांना एका मागे एक धक्के बसत आहेत. काल दिग्विजयसिंग यांनीच राहुल गांधींचे माप काढले आणि ते राज्यकर्ता होण्यास लायक नाहीत असे स्पष्टपणे प्रतिपादन केले. कॉंग्रेसच्या पराभवाला गांधी घराणे जबाबदार आहे आणि जोपर्यंत कॉंग्रेसचे नेते गांधी घराण्यावर अवलंबून राहतील तोपर्यंत या पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत ही वस्तुस्थिती आता त्यांनाही जाणवायला लागली आहे. आता त्यांनी राहुल गांधी यांच्यात पक्षाचा उद्धार करण्याची क्षमता खरीच आहे का असा प्रश्‍न करायला सुरूवात केली आहे. त्याच मालिकेत दिग्विजयसिंग यांनी राहूल गांधी यांच्या कार्यक्षमतेचे आणि मानसिकतेचे विश्‍लेषण केले.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी २००० सालपासून राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा चंग बांधला होता. तसा आग्रह धरणार्‍यांमध्ये दिग्विजयसिंग आघाडीवर होते. अगदी गेल्याच वर्षी राहुल गांधींच्या वाढदिवसा दिवशी याच दिग्विजयसिंगांनी राहुल गांधी हे पंतप्रधान होण्यास पूर्ण पात्र आहेत असे प्रमाणपत्र दिले होते. त्यांच्या या प्रतिपादनामुळे कॉंग्रेस पक्षात मनमोहनसिंग यांना हटवण्याची मोहीम हळूहळू आकारालासुध्दा यायला लागली होती आणि गेल्या लोकसभा निश्रक्षहवडणुकीत राहुल गांधींचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले नसले तरी तसे वातावरण निर्माण करण्यात आले होते. कॉंग्रेसचे नेते काहीही म्हणोत. राहुल गांधी या पदाला अपात्र असतानाही कॉंग्रेसचे नेते त्यांच्या भोवती कितीही आरत्या ओवाळोत पण जनतेने राहुल गांधींची पात्रता ओळखली होती आणि त्यामुळे कॉंग्रेसचा सपाटून पराभव झाला. आजवर त्यांची भलामण करणारे दिग्विजयसिंग आता मात्र राहुल गांधींच्या मध्ये चांगला प्रशाासक गुणधर्म नाहीत हे उघडपणे मान्य करायला लागले आहेत. खरे म्हणजे त्यांना आता तसे मान्य करण्यावाचून काही पर्याय राहिलेला नाही कारण राहुल गांधींनी प्रत्येक जबाबदारीच्या कामातून कसा पाय मागे घेतलेला आहे हे लोक पहात आलेले आहेत.

मंत्री होण्याची संधी असताना ते मंत्री झाले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा काय अनुभव आहे याबद्दल लोक अनभिज्ञ राहिले. उलट १५ वर्षे गुजरातचे प्रशासन चालवणारे मोदी समोर उभे असल्यामुळे लोकांनी त्यांना पसंत केले. आता कॉंग्रेसवर विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी येऊन पडली आहे. कॉंग्रेसने राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. तेव्हा आता राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी नेते म्हणून खंबीरपणे उभे राहतील असे लोकांना वाटले होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधींनी आपण विरोधी पक्ष म्हणूनसुध्दा चांगले काम करू अशी वल्गना केली होती. परंतु लोकसभेतल्या कॉंग्रेस पक्षाच्या गटाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले नाही. मंत्री होण्याची संधी असताना मंत्रीपद स्वीकारले नाही आणि विरोधी पक्षनेता म्हणून संधी आली असताना तिच्यातूनही पाय मागे घेतला. याचा अर्थ राहुल गांधींच्या अंगी जबाबदारी स्वीकारण्याची कुवत नाही असाच होतो. हे लोकांना उघडपणे दिसत आहे. आजवर झाकली मूठ सव्वा लाखाची या न्यायाने राहुल गांधींची ही अकार्यक्षमता लपवून ठेवण्यात यश आले. पण आता फार दिवस त्यावर पांघरूण घालता येणार नाही हे लक्षात आले आहे. म्हणूनच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी लोकसभेतल्या कॉंग्रेस गटाचे नेतृत्व मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवले आहे.

परिणामी, कॉंग्रेस पक्षाचा प्रभाव कमी पडणार आहे. कारण खर्गे हेसुध्दा खरेच किती तयारीचे आहेत याचाही अनुभव लोकांना यायला लागला आहे. नकळतपणे लोकसभेत सत्ताधारी पक्षाला आव्हान देऊ शकेल, त्याच्यावर अंकुश लावेल असा विरोधी पक्षच शिल्लक राहिलेला नाही. जयललिता, नवीन पटनायक आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षांचे खासदार विरोधी म्हणून निवडून आले आहेत परंतु ते सरकारला आव्हान देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. कारण ते सगळे प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत. आपल्या प्रदेशातला प्रभाव हेच त्यांचे भांडवल आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या विरोधात उभे राहण्यात रस नाही. त्यामुळे डाव्या आघाडीचे १६ खासदार आणि कॉंग्रेसचे ४४ खासदार असेच राष्ट्रीय अजेंडा असणारे विरोधी खासदार लोकसभेत आहेत आणि राहुल गांधींनी यातल्या कॉंग्रेसच्या गटाचे नेतृत्व स्वीकारले असते तर विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा सुधारली असी त्यांना आपले कर्तृत्व दाखवण्याची ही एक छान संधी होती. परंतु राहुल गांधींनी ती संधी वाया घालवली आहे. कारण लोकसभेत आयत्यावेळी बोलावे लागते, सरकारशी वाद विवाद करावा लागतो. नियमांचा आधार घेऊन सरकारला कोंडीत पकडावे लागते. या गोष्टींच्यापासून राहुल गांधी कित्येक मैल लांब आहेत.

Leave a Comment