थुंबा ते श्रीहरीकोटा एक यशस्वी वाटचाल

thumba
भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) या संस्थेने १९६२ साली थुंबा येथे अंतराळ संशोधनाच्या कामाला सुरूवात केली. तेव्हा थुंबा या गावाजवळ साधी सडकसुध्दा नव्हती. मात्र या संशोधन केंद्रात रशियामधून आलेले एक यंत्र घेऊन जाण्याची गरज होती. तिथे मोटार जात नव्हती म्हणून हे रशियन यंत्र बैलगाडीतून तिथे नेण्यात आले होते. त्या बैलगाडीतून भारताचा अंतराळ संशोधन प्रवास सुरू झाला आहे आणि आज भारत हा जगातला या क्षेत्रातला आघाडीचा देश झाला आहे. १९७५ साली भारताने या क्षेत्रात पहिले मोठे पाऊल टाकले. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा अवकाशात सोडण्यात आला. तेव्हा आपले उपग्रह अवकाशात नेऊन सोडण्याची यंत्रणा आणि क्षमता भारताकडे नव्हती. १९६२ साली सुरू झालेल्या या प्रवासात आपण १३ वर्षांमध्ये स्वतःचा एक उपग्रह तयार करू शकलो एवढीच प्रगती झाली होती. आपला हा आर्यभट्ट नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्याचे काम रशियाच्या रॉकेटच्या साह्याने झाले होते. नंतरच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी एएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि पीएसएलव्ही अशा रॉकेटांच्या तीन मालिका विकसित केल्या आणि स्वतःचे प्रक्षेपणास्त्र विकसित करण्यात यश मिळवले.

आपण आपले प्रेक्षपणास्त्र तयार केले असले तरी ते अवकाशात सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्षेपण तळावरच्या सोयी आणि यंत्रणा आपल्याकडे विकसित झाल्या नव्हत्या. त्यामुळे क्षेपणास्त्रे तयार होऊनसुध्दा आपण काही बाबतीत परावलंबी होतो. क्षेपणास्त्र आपले, उपग्रह आपला पण त्याचे प्रक्षेपण मात्र यूरोपातून केले जात होते. आता मात्र आपण या तिन्हींच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण तर झालो आहोतच पण जगात आघाडीवर आहोत. पीएसएलव्ही सी २३ या प्रक्षेपक यानाच्या मदतीने आपण पाच उपग्रह अवकाशात सोडले आहेत. श्रीहरीकोटा येथे झालेल्या या प्रक्षेपणाच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते. भारताच्या अशा निर्णायक संशोधनाच्या प्रसंगात स्वतः हजर राहणारे ते तिसरे पंतप्रधान. यापूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांनी अशा प्रसंगात हजेरी लावलेली होती. नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना या प्रसंगी मोठी प्रेरणा दिली. सारा भारत देश तुमच्या या प्रयोग शाळेतल्या साधनेबद्दल अभिमान बाळगून आहे, असे ते म्हणाले. आज आपण सोडलेल्या पाच उपग्रहात दोन उपग्रह कॅनडाचे आहेत. सिंगापूर, जर्मनी आणि फ्रान्सचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. आतापर्यंत भारतीय क्षेपणास्त्रांनी परेदशातले ३५ उपग्रह अवकाशात सोडले होते. आजच्या या उड्डाणामुळे ही संख्या ४० झाली आहे.

या व्यवसायातून भारताने आजवर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, जपान अशा प्रगत देशांचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. आजवर भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने १०० मोहिमा पार पाडल्या आहेत. त्यातल्या चांद्रयान १ आणि मार्स मिशन या दोन मोहिमा विशेष प्राविण्याने आखल्या गेल्या. मार्स मिशन म्हणजे मंगळावर सोडलेले अवकाशयान. हे अवकाशयान आता ठरल्याप्रमाणे मार्गक्रमण करत असून ते मंगळाच्या कक्षेत जाऊन मंगळाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मंगळाच्या बाबतीत विचार केला तर भारत अमेरिकेपेक्षा मागे आहे. कारण अमेरिकेचे मंगळावरील यान त्या ग्रहावर उतरले आहे. भारताला अजून मंगळावर पाऊल ठेवता आलेले नाही. चांद्रयान १ या चंद्रावरील मोहिमेतसुध्दा आपण अमेरिकेच्या एक पाऊल मागे आहोत. अजून आपला अवकाशवीर चंद्रावर उतरलेला नाही. मात्र चांद्रयान १ हे यान चंद्रावर उतरले आहे आणि त्याने आपल्या सोबत अमेरिकेचे एक साधन नेऊन तिथून चंद्राची काही विशेष माहिती जमा करण्यात यश मिळवले आहे. चांद्रयान एक च्या या माहितीमुळे चंद्राविषयीच्या संशोधनाला एक नवीन वळण लागले आहे. हे भारताचे यश आहे. परंतु भारताचे खरे यश त्याच्या प्रक्षेपणास्त्रामध्ये आहे. याबाबतीत भारताने यश मिळवून इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यातून आपल्याला परदेशी चलनाची प्राप्ती होणार आहे.

जगात अनेक देश असे आहेत की ज्यांचे उपग्रह तयार आहेत आणि त्यांना अवकाशात सोडून काही कामे करून घ्यायची आहेत मात्र त्या उपग्रहांना अवकाशात नेऊन सोडण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही अशा लहान आणि मोठ्याही देशांचे उपग्रह कोणीतरी अवकाशात नेऊन सोडावे लागतात. ते काम आपण करणार आहोत. पण ते काम फार जोखमीचे आहे. त्यांचा उपग्रह घेऊन गेलेले आपले प्रक्षेपक यान यशस्वी झालेच पाहिजे अन्यथा आपलेही नुकसान होते आणि त्यांच्या उपग्रहाचीही हानी होते. मात्र भारताला आपल्या प्रक्षेपण क्षमतेचा पूर्ण विश्‍वास आहे आणि त्यामुळेच आजवर ब्रिटन, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, अर्जेंटिना, लुग्झेंबर्ग, उत्तर कोरिया अशा कितीतरी देशांना आपण प्रक्षेपणाची सेवा बहाल केलेली आहे. हे सारे खरे आहे परंतु आजवर आपण प्रक्षेपणाच्या व्यवसायातून नेमके किती परकीय चलन मिळवले आहे याचा आकडा अजून जाहीर झालेला नाही. तो जाहीर झाला म्हणजे आपल्या या व्यवसायाचे नेमके स्वरूप समजू शकेल.

Leave a Comment