ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडला डे-नाईट कसोटीचा पहिला मान

combo
वेलिंग्टन – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांदरम्यान पुढील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात दिवस-रात्र सत्रात कसोटी सामना खेळविला जाणार आहे. जागतिक क्रिकेट इतिहासाच खेळविण्यात येणार्‍या या कसोटी सामन्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील ऍडीलेड किंवा होबार्ट येथे खेळविण्यात येणार आहे, अशी माहिती दोन्ही क्रिकेट मंडळांनी दिली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड व न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख डेव्हिड व्हाईट म्हणाले की, पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रथमच अशा प्रकारचा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दिवस-रात्र सत्रातील कसोटी सामन्यांच्या प्रसारासाठी अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येणार आहे.

जगातील प्रत्येक भागात कसोटी क्रिकेट आणखी लोकप्रिय व्हावे, अशी आमची भावना आहे. जगभरात सध्या कसोटी सामने हे कार्यालयीन वेळेत आणि मुले शाळेत असताना खेळविण्यात येतात. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठी हा नवा मार्ग शोधून काढण्यात आला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सध्या वापरण्यात येत असलेल्या लाल चेंडूला पर्याय म्हणून रात्री चेंडू व्यवस्थित दिसण्यासाठी गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक स्पर्धांमध्ये या चेंडूचा यशस्वी वापर करण्यात आला आहे, असे देखील सदरलँड यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment