आज विवेकानंद असते तर?

vivekanand
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेवरून सुरू झालेला वाद बघून मनात एक असा प्रश्‍न निर्माण होतो की, हिंदू धर्माची ध्वजा अमेरिकेत फडकविणारे स्वामी विवेकानंद आज हयात असते तर त्यांनी या प्रश्‍नांच्या बाबतीत काय भूमिका घेतली असती ? विवेकानंदांची १५० जयंती नुकतीच साजरी झाली. ते वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते. धर्मामुळे समाजाचे प्रश्‍न सुटत नाहीत, त्यामुळे लोक धर्मापासून दूर जात होते अशा काळात स्वामीजींनी देशात आणि परदेशात वैदिक धर्माचा प्रचार केला. त्यांनी धर्मामध्ये आलेल्या विसंगतींवर कठोर प्रहार केले. ते जर आज हयात असते तर त्यांना शंकराचार्यांवर टीकेचे आसूड ओढले असते. कारण विवेकानंदांनी इस्लामचा कधीच द्वेष केला नाही. इस्लाम असो, ख्रिश्‍चन धर्म असो की अन्य कोणताही धर्म असो त्या प्रत्येक धर्माने आपापल्या परीने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिंदू धर्म अन्य कोणत्याही धर्माला चुकीचा मानत नाही. १८९३ साली अमेरिकेत झालेल्या सर्वधर्म परिषदेत भाषण करताना स्वामीजींनी हिंदू धर्माचे सगळ्यांपेक्षा वेगळेपण म्हणून हीच गोष्ट नमूद केली होती. आपला परिचय करून देतानाच त्यांनी म्हटले होते की, मी अशा एका धर्माचा प्रतिनिधी आहे की, जो धर्म सर्व धर्मांचा आदर करतो. माझ्या धर्मामध्ये ज्याला ज्या मार्गाने परमेश्‍वर प्राप्ती होऊ शकेल त्या मार्गाने जाण्याचे स्वातंत्र्य आहे. माझा हिंदू धर्म हा चौकटीत बंद झालेला धर्म नाही.

स्वामीजींच्या या म्हणण्यानुसार भारतातल्या करोडो लोकांना साईबाबा हे देव वाटत असतील तर त्यांना साईबाबांचे देव म्हणून पूजा करण्याचा अधिकार आहे आणि या करोडो लोकांच्या भावनेनेच साईबाबांना देवत्व प्राप्त झालेले आहे. साईबाबा हे मला देव म्हणा म्हणून कोणाच्या मागे लागलेले नव्हते. लोकांनी त्यांना देव मानले आहे. परंतु शंकराचार्यांना ते का खुपत आहे हे कळत नाही. हिंदू धर्मात गायीला देव मानले जाते, निसर्गातल्या सगळ्या घटकांना देव मानून पूजा करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. जे जे चांगले आहे त्यांची पूजा करावी असे हा धर्म सांगतो. मग या धर्मामध्ये सत्वशील माणसाला देव मानणे हे चुकीचे कसे ठरेल? पण शंकराचार्यांनाच हिंदू धर्म म्हणजे काय हे समजून सांगण्याची वेळ आली आहे. खरे म्हणजे त्यांना सार्‍या गोष्टी कळतात, परंतु स्वरूपानंद यांना साईबाबांच्या निमित्ताने समाजात असंतोष निर्माण करायचा आहे. त्यांनी आता या वादात केंद्रीय मंत्री उमा भारती यांनाही ओढले आहे.

उमा भारती यांनी या वादामध्ये विधायक भूमिका घेतली होती, परंतु ती द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी होती. त्यामुळे शंकराचार्य चिडले आणि त्यांनी आपल्या आश्रमामध्ये साधू-संतांची बैठक बोलावली. या बैठकीत उमा भारती यांच्यावर टीका करण्यात आली. उमा भारती या सुद्धा सन्यासी आहेत आणि वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या प्रवचने करीत आलेल्या आहेत. धर्म म्हणजे काय, पूजा कोणाची करावी आणि कोणाची करू नये, याबाबतीत त्यांची समज शंकराचार्यांपेक्षा काही कमी नाही. त्यांनी साईबाबांच्या पूजेमध्ये काही गैर नसल्याचे विधान केले होते. अर्थात स्वामी स्वरूपानंद हे सन्यासी असूनही इतके अहंकारी आहेत की, त्यांना धर्माच्या बाबतीत आपल्यापेक्षा वेगळे मत व्यक्त केलेले आवडत नाही. त्यामुळे त्यांनी उमा भारती यांच्यावर आगपाखड केली. उमा भारती यांनी स्वामी विश्वेशतीर्थ यांच्याकडून दिक्षा घेतलेली आहे. त्यांचे हे गुरू शंकराचार्यांशी सहमत आहेत. पण उमा भारती या सहमत नाहीत. याचा अर्थ साईबाबांच्या पूजेवरून उमा भारती आणि त्यांच्या गुरूमध्ये मतभेद आहेत. या मतभेदावर स्वामी स्वरूपानंद यांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. साईबाबांची पूजा आणि त्यातून निर्माण झालेला वाद यामध्ये प्रश्‍न निर्माण होण्यात काही चूक नाही. कारण त्या प्रश्‍नाच्या अनुरोधाने काही चांगली चर्चा होणार असेल तर ती हिंदू समाजाला मार्गदर्शन करणारी ठरणार आहे. परंतु या वादातल्या दोन्ही बाजू वैचारिक मार्गावरून भरकटत आहेत.

शंकराचार्यांनी साईबाबा हे देव नाहीत असे म्हटल्यामुळे दुखावलेल्या साई भक्तांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रश्‍नाचा निकाल पोलीस ठाण्यात कसा लागणार आहे हे काही कळत नाही. साईबाबा देव नाहीत असे म्हटल्यामुळे त्यांना चीड आली असेल तर त्यांनी साईबाबा हे देव कसे आहेत हे सिद्ध करून द्यावे आणि ते सिद्ध करणे अवघड नाही. परंतु या प्रकरणात पोलिसात जाण्यामध्ये कसलेही शहाणपण नाही. दुसर्‍या बाजूला शंकराचार्यांनीही असेच आततायीपणाचे पाऊल उचलले आहे. उमा भारती यांनी शंकराचार्यांचे म्हणणे आपल्याला मान्य नाही असे म्हटले, त्यावर शंकराचार्य चिडले आणि त्यांनी उमा भारती यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी पंतप्रधानांकडे मागणी केली. आता या गोष्टीचा मंत्रिमंडळात असण्याशी काय संबंध आहे हे काही कळत नाही. साईबाबा देव नाहीत हे मान्य करील तोच भारताच्या मंत्रिमंडळात राहू शकतो आणि त्यांना देव मानेल तो मंत्रिमंडळात राहू शकत नाही असा काही भारताचा कायदा नाही. शंकराचार्यांना हे कळते, पण त्यांना नरेंद्र मोदींच्या सरकारला धार्मिक वादामध्ये ओढण्याची खुमखुमी आली आहे.

Leave a Comment