पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास श्रीलंकेकडून निर्बंध

srilanka
नवी दिल्ली – श्रीलंकेने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर निर्बंध लादले आहेत, कारण भारतावर आक्रमण करण्यासाठी जिहादी संघटना श्रीलंकेच्या भूमीचा वापर करत असल्याचे तपासाअंती लक्षात आले आहे, अशी माहिती एका प्रसारमाध्यमाने आपल्या या संबंधीच्या अहवालात दिली आहे.

श्रीलंकेच्या भारताकडे येणाऱ्या मार्गाचा गैरवापर चेन्नईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. मलेशियासह चाललेल्या बहुराष्ट्रीय तपासामध्ये संशयित दहशतवादी शाकिर हुसेन अशा प्रकारे रेकी करून तब्बल 20 वेळा भारतात येऊन गेल्याचे सिद्ध झाले आहे. आपण दहशतवाद्यांना मालदीवमार्गे बेंगळूर आणि चेन्नईतील अमेरिकन दूतावासांवर हल्ला करण्याची कामगिरी सोपविली होती, अशी कबुली शाकिरने दिली आहे.

दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये पाकिस्तानी अधिकारी सामील असल्याकडेही कोलंबोतील तपास यंत्रणांनी लक्ष वेधले आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीत नरेंद्र मोदींनी या गोष्टीकडे त्यांचे लक्ष वेधले होते, तेव्हा राजपक्षे यांनी ही बाब खूपच गंभीर असल्याचे म्हटले होते. मायदेशात परत जाताच त्यांनी याबाबत एक शोध समिती नेमली. तिच्या अहवालानंतरच ही कारवाई करण्यात आली.