लंडन – ब्रिटनमधील ५३ वर्षीय डेंटिस्ट डॉक्टर जेम्स हल यांनी आयुष्यभर झटून केलेला ४५० कारचा अलौलिक संग्रह आता विकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे डॉ.जेम्स यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे जगभरात हा खासगी मालकीचा सर्वात मोठा संग्रह मानला जातो. या विक्रीतून डॉ. जेम्स यांना १० कोटी पौंड म्हणजे १० अब्ज २२ कोटी रूपये मिळतील अशी अपेक्षा आहे.
डेंटिस्टचा ४५० कारचा संग्रह विक्रीला
जेम्स यांच्या संग्रहात १९१९ पासून ते आत्तापर्यंतच्या अनेक कार आहेत. जगभर फिरून त्यांनी या गाड्या गोळ्या केल्या आहेत. घराजवळ जागा नाही म्हणून त्यांनी कार ठेवण्यासाठी हेयरफोर्डशायर भागात वेअर हाऊस घेतले आहे. वयाच्या १७ व्या वर्षीपासूनच हा छंद त्यांना लागला. त्यांच्या संग्रहात विन्स्टन चर्चिल यांनी चालविलेली ऑस्टीन, बेंटले, जग्वार अशा अनेक कार असून त्यातील कांही अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा गाड्यांशिवाय त्यांच्या संग्रहात २९५ पॅडल कार आणि जागतिक युद्धात वापरली गेलेली १९ विमानेही आहेत.
डॉ. जेम्स यांना कॅन्सर झाला आहे. ते म्हणतात आयुष्यभर मी लोकांचे दुखणारे दात दुरूस्त करणे आणि गाड्यांच्या नंबरप्लेट लक्षात ठेवणे यासाठीच माझ्या मेंदूचा अधिक वापर केला आहे. त्यांच्या संग्रहातील गाड्यांनी अनेक जागतिक स्पर्धात भाग घेतला आहे तसेच महाराणीच्या वाढदिवसानिमित्त होणार्या परेडमध्येही त्या सहभागी झाल्या आहेत.