हॉलंड, नेपाळला आयसीसीकडून टी-20 दर्जा

srinivasan
मेलबोर्न – हॉलंड आणि नेपाळ या दोन संघांना एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन दिवसांच्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत टी-20 आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. बांगलादेशमध्ये याचवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ पात्र ठरले होते.

आता टी-20 आंतरराष्ट्रीय दर्जा आठ देशांना आयसीसीतर्फे देण्यात आला आहे. अफगाणिस्तान, हाँगकाँग, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यु गिनिया (पीएनजी), संयुक्त अरब अमिरात, हॉलंड आणि नेपाळ असे आता आठ संघ आहेत. आयसीसीचा नियोजित विविध दौरा कार्यक्रम 2023 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. आयसीसीने कसोटी, वनडे आणि टी-20 या तीन प्रकारांमध्ये मायदेशात तसेच विदेशात दहा देशांचे सामने समतोल ठेवून 2023 पर्यंतचा क्रिकेट दौरा कार्यक्रम निश्चित केला आहे. आयसीसीच्या प्रमुख कार्यकारी समितीच्या शिफारसीनुसार या आगामी दौरा कार्यक्रमासंदर्भात संबंधित देशांच्या सदस्यांनी या कार्यक्रम पत्रिकेवर स्वाक्षऱया करण्याची सक्ती आयसीसीकडून करण्यात आली आहे. आयसीसीची पुढील बैठक येत्या ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

आयसीसीच्या प्रमुख कार्यकारी समितीने अनेक बदल करण्याच्या शिफारसीला आयसीसीने मान्यता दिली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्लेईंग कंडिशन्स संदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2014 पासून केली जाईल, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. या बैठकीत अन्य काही बदल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमधील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयसीसीच्या समितीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरविले आहे. या बैठकीला आयसीसीचे प्रमुख कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन, डेव्हिड कॉलियर, बीसीसीआयचे प्रतिनिधी सुंदर रमण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी जेम्स सुदरलँड उपस्थित होते.

Leave a Comment