बायकोच्या कपड्यांवर आक्षेप म्हणजे कूरताच; कौटुंबिक न्यायालयाचा निर्वाळा

court
मुंबई – बायकोच्या कपडे घालण्यावरून आक्षेप घेऊन केवळ साडी घालण्यासाठीच तिच्यावर दबाव आणणे हा नवर्‍याच्या कू्रर स्वभावाचाच एक भाग असून, या आधारावर घटस्फोटासाठी बायको अर्ज दाखल करू शकते, असा निर्वाळा येथील एका कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

घटस्फोट मिळावा, यासाठी याचिका दाखल करणार्‍या एका महिलेने म्हटले आहे की, आमचा विवाह डिसेंबर २०१० मध्ये झाला. पण, तेव्हापासून माझ्या नवर्‍याने आजपर्यंत माझ्याकरिता कधी एक वस्त्रही खरेदी केले नाही. उलट मीच आपल्या मिळकतीतून स्वत:करिता कुर्ता आणि जीन्स पॅण्ट खरेदी केले. तथापि, माझ्या नवर्‍याला मी असे कपडे घातलेले आवडत नाही. मी केवळ साडी घालावी, यासाठी तो दबाव आणत असतो आणि त्रासही देत असतो. इतकेच नव्हे, तर माझा नवरा आणि सासू माझ्यावर माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठीही दबाव आणत असतात. मी पैसे आणले नाही, तर गंभीर परिणामाचीही धमकी देत असतात. सोबतच, मी नोकरी सोडावी म्हणूनही दबाव टाकतात. या सर्व त्रासामुळे मी आयुष्यात निराश झाले आहे.

माझ्या नवर्‍याने व सासरच्या अन्य मंडळींनी मला १५ मार्च २०११ रोजी घराबाहेर काढले. त्यानंतर मी आपल्या माहेरी गेले. याच काळात माझी नोकरीही गेली. पण, मला आपल्या घरी परत नेण्यासाठी माझा नवरा कधीही आला नाही. उलट मोबाईलवर घाणेरडे एसएमएस करून त्याने आम्हाला त्रासच दिला आहे, याकडेही तिने लक्ष वेधले.

या महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. लक्ष्मी राव यांनी विशेष विवाह कायदा १९५४ मधील कलम २७(१)(ड)चा आधार घेत, तिला घटस्फोट मंजूर केला.

याचिकाकर्त्या महिलेने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याला आव्हान देताच येत नाही. या कलमात कू्ररतेची परिभाषा स्पष्ट आहे. नवर्‍याने तिला कुर्ता आणि जीन्स पॅण्ट घालण्यास मनाई करणे, हा कू्ररतेचाच एक प्रकर आहे. या प्रकरणात नवरा अतिशय कू्ररपणे वागत असल्याचे तिने सिद्ध केले आहे आणि याच आधारावर आपले न्यायालय तिला घटस्फोट मंजूर करीत आहे, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.

Leave a Comment