देशाच्या पूर्व भागात पाऊस; उर्वरित भारत कोरडाच

water
पुणे – नैरुत्य मोसमी पावसाची अर्थात मान्सूनची उत्तरसीमा कायम असून, देशाच्या पूर्व भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु, इतर ठिकाणी मात्र पावसाने दडी मारली आहे. पूर्व भागात हिमालयाचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मान्सून पुरेपूर सक्रिय झाला आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. झारखंड, बिहार, कोकण-गोवा, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळचा भाग त्याने व्यापला असला, तरी तेथे जून महिन्यात फार कमी पाऊस झाला आहे.

देशाच्या पूर्व भागात मागच्या 24 तासांत आगरतळा 5.1, भुवनेश्वर 2.3, दार्जिलिंगमध्ये 16.4, दिब्रुगड 26, गंगटोक 11.4, गुवाहाटी 9.7, तर पासीघाटमध्ये तब्बल 132.1 मिमी पावसाची नोंद झाली. पण देशाच्या इतर भागांत खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भागात वाराणसीत 15 मिमी सोडला, तर श्रीनगर, नवी दिल्ली, जोधपूर, अमृतसर, देहराडून आदी भागांत पावसाने हजेरी लावलेली नाही. मध्य भारतातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. नागपुरातील 13.6 पाऊस वगळता अन्यत्र कुठेही विशेष नोंद दिसत नाही. भोपाळ, इंदौर, जबलपूर येथे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. दक्षिण भारतात याहीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे फक्त हैदराबादमध्ये 10.5 मिमी पाऊस सोडला, तर इतरत्र कोठेही पावसाने हजेरी लावलेली नाही.

चेन्नई, कन्यकुमारी, बेंगळूर, भूज, मदुराई आदी भागांत पावसाने पाठ फिरवली आहे. तसेच गुजरात, मुंबई, पुणे, राजकोट, तिरूअनंतपुरम, तिरूचिरापल्ली, विशाखापट्टणम, महाबळेश्वर, मेंगलूर, औरंगाबाद आदी भागदेखील अजूनही कोरडाच आहेत. अंदमान-निकोबार बेटावर तुरळक प्रमाणात पाऊस झालेला आहे. यात निकोबारमध्ये 3.4, मिनिकोय 2.4 आणि पोर्टब्लेअरमध्ये 1.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.महाराष्ट्रात विदर्भात नागपूर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र, महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे. पुढील 48 तासांत विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात शनिवारी सकाळपर्यंत सगळ्यात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे 39.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

Leave a Comment