आयएसआयएसच्या ताब्यात बहुतांश शहरे

iraq
बगदाद – इराकमधील बहुतांश शहरांवर सुन्नी दहशतवाद्यांची संघटना असलेल्या आयएसआयएसने ताबा मिळविला आहे. बगदाद जिंकण्याच्या मनसुब्याने आता या संघटनेच्या अतिरेक्यांनी आक्रमकपणे कूच सुरू केली असून, हे शहर वाचविण्यासाठी इराकी फौजाही सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत हजारावर नागरिक आणि इराकी फौजांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्याकडे ओलिस असलेल्या २०० सैनिकांची गोळ्या घालून कू्ररपणे हत्या केली असल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील ‘ह्युमन राईट्‌स वॉच’ला या नरसंहाराची छायाचित्रे व सॅटेलाईट ईमेज प्राप्त झाले आहेत. ११ ते १४ जून या काळात तिकरित शहरातील सद्दाम हुसेनच्या राजमहालाच्या परिसरात २०० पेक्षा जास्त इराकी सैनिकांना गोळ्या घालण्यात येत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे.
या मानवाधिकार संघटनेच्या मते, मृतांचा आकडा आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. १२ जूनला आयएसआयएसने तिकरित शहरातच १,७०० शिया सैनिकांची हत्या केल्याचाही या संस्थेचा दावा आहे. आपल्या दाव्याला बळकटी देताना या मानवाधिकार संस्थेने पुरावे म्हणून इंटरनेटवर छायाचित्रेही अपलोड केली आहेत. त्यात शस्त्रधारी दहशतवादी शेकडो ओलिसांची हत्या करताना दाखविण्यात आले आहे. या नरसंहारानंतर २२ जूनला इराकच्या मानवाधिकार मंत्र्यांनी १७५ सैनिकांची हत्या झाल्याचे सांगितले होते.

आयएसआयएसने १२ जूनला आपल्या कथित ट्विटर अकाऊंटवर शिया सैनिकांची हत्या केल्याची माहिती दिली होती. सुन्नी दहशतवाद्यांनी यासाठी एका व्हिडिओ अपलोड केला आहे. शेकडो ओलिसांची हत्या केल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. नंतर १४ जूनला दहशतवाद्यांनी ६० छायाचित्रे इंटरनेटवर पोस्ट केली होती. चेहर्‍यावर मास्क लावलेले दहशतवादी ओलिसांना एका ट्रकमध्ये बळजबरीने भरत असताना त्यात दाखविण्यात आले आहे.

Leave a Comment