राष्ट्रवादीकडून काँग्रेसची अडवणूक; अर्ध्या जागांची मागणी

ncp
मुंबई – पुढील ऑक्टोबरमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १४४ जागा मिळाव्यात, या भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम आहे. आमची मागणी काँग्रेस पक्षाने मान्य न केल्यास विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढण्याचा पर्याय आम्हाला निवडावा लागेल आणि त्यासाठी गरज पडल्यास काँग्रेससोबतची मैत्रीही तोडावी लागेल, अशा भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता आले आहेत.

काँग्रेस पक्ष सलग १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहे. आतापर्यंत हा पक्ष मोठा होता. पण, अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आहे. या आधारावर विधानसभा निवडणुकीत आम्ही जास्त जागांची मागणी करणार नसलो, तरी दोन्ही काँग्रेसने समसमान जागा वाटून घ्याव्या, अशी आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हायलाच हवी, असे पवार यांचे मत असल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

पवार यांचा यावेळी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा राज्याच्या सत्तेत यायचेच, असा निर्धार आहे. स्वबळावर लढल्यास अधिक जागा मिळतील आणि त्यानंतर सत्तेसाठी काँग्रेससह कोणत्याही पक्षांशी वाटाघाटी करता येतील, असे डावपेच पवारांनी आखले आहेत. २००९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या यशानुसार विधानसभेसाठी १७४ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीला ११४ जागांवर समाधान मानावे लागले होते. पण, या पाच वर्षांत परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोन तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे आताही लोकसभेतील कामगिरीनुसार जागावाटप व्हायला हवे, असे शरद पवार यांचे स्पष्ट मत आहे.

राज्यात दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठींचे निर्णय झिरपत नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. शरद पवार व सोनिया गांधी चर्चा करून निर्णय घेतात, मात्र मुख्यमंत्री तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आपापल्या सोयीप्रमाणे दिल्लीतील निर्णयाचा अर्थ लावून अंमलबजावणी करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्यावेळी असेच झाले. यामुळे आता कॉंग्रेसवर विसंबून न राहता स्वत:ची ताकद आजमावण्याच्या निर्णयापर्यंत पवार आले असल्याचे या नेत्याने सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत गेल्यास सध्या आहेत त्या ६२ जागा राखणेही कठीण होईल, अशी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची भावना आहे. देशभरात कॉंग्रेसविरोधी लाट असल्याने त्याचा फटका आपल्यालाही बसण्याची शक्यता जास्त असल्याने स्वतंत्रपणे लढणे कधीही सोयीस्कर असल्याचा पवारांचा विचार झाला आहे, असे सांगताना हा नेता म्हणाला की, आताच्या ८२ आमदारांपैकी निम्म्या जागाही कॉंग्रेसला राखणे अशक्य जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सर्वेक्षणाचा दिसून आले आहे.

Leave a Comment