बारकोड चाळीस वर्षांचा झाला

bar
उत्पादनांसंबंधीची सारी माहिती काळ्या बारीक – जाड रेषांत देणारा बारकोड यंदा चाळीस वर्षांचा झाला. २६ जून १९७४ रोजी रिग्ले ज्यूसी फ्रूट गम साठी जगात प्रथम बारकोड स्कॅन केला गेला होता. हे १० युनिटचे पॅक आजही संग्रहालयात जनत करून ठेवले गेले आहे.

वेगाने विकल्या जाणार्‍या उत्पादनांची लगोलग माहिती मिळावी आणि ऑटोर्मटिक पद्धतीने ही उत्पादने रेकॉर्ड करता यावीत यासाठी बारकोड वापरले जातात. यामुळे उत्पादकांना शिपमेंटसाठी उत्पादने पॅक करताना पूर्ण बॉक्ससाठी युनिक आयडेंटिफिकेशन करणे शक्य होते. यावर वापरल्या गेलेल्या विशिष्ट तर्‍हेच्या बारकोडमुळे या उत्पादनांसंबंधीची सर्व माहिती जाणून घेणे जसे शक्य असते तसेच या माहितीचा उपयोग कोणत्या उत्पादकांची मागणी अधिक आहे हे ओळखण्यासाठीही होऊ शकतो.

वॅलेन्स फ्लिंट याने या पद्धतीचा शोध १९३२ साली प्रथम लावला किंवा त्याला तशी कल्पना सुचली पण त्यावेळी त्याचा वापर प्रत्यक्षात करणे शक्य होईल असे कुणालाच वाटले नव्हते. ४० वर्षांनंतर त्याने पुन्हा नॅशनल असोसिएशन ऑफ फूट चेन्सच्या उपाध्यक्षांकडे यासाठी प्रयत्न केले. मात्र युनिफॉर्म प्रॉडक्ट कोड बनविण्याचे श्रेय गेले ते जोसेफ वुडलंड आणि बर्नार्ड सिल्वर यांच्याकडे. २० आक्टोबर १९४९ साली त्यांनी बारकोडचे पेटंट घेतले मात्र त्याचा प्रत्यक्ष वापर १९७४ साली सुपरमार्केटमध्ये केला गेला असा बारकोडचा इतिहास आहे.