ऑस्ट्रेलियात वर्णभेदाचा भारतीय कुटुंबाला फटका

indina
मेलबर्न – तीव्र वर्णभेदाचा फटका एका भारतीय कुटुंबाला बसला असून दोन व्यक्तींनी त्यांच्याशी अत्यंत हीन दर्जाचे वर्तन केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे,तेथील पोलिसांनी याप्रकरणी एका युवकाला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे.

या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत अधिक माहिती अशी ,ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्यात इप्सविच भागात राज शर्मा यांचे ‘महफिल’ नावाचे रेस्टॉरंट आहे. ते, त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना रेस्टॉरंटबाहेर दोन ऑस्ट्रेलियन तरुणांनी अडवले आणि त्यांनी शर्मा कुटुंबीयांना वर्णभेदावरून शिव्या द्यायला सुरुवात केली तसेच त्यांच्यावर थुंकून आपला द्वेष व्यक्त केला. राज शर्मा यांनी या प्रकाराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.शर्मा कुटुंबीयांशी अभद्र वर्तन करणाऱ्या २२ वर्षीय तरुणावर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याला १६ जुलैला कोर्टापुढे उभं केले जाणार आहे. मात्र तोपर्यंत त्याला नजरकैदेत ठेवले जाणार आहे.ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरही काही वर्षांपूर्वी हल्ले झाले आहेत. या घटनेमुळे वर्णभेदी संघर्षाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment