निरा स्नानानंतर माऊलींचा शूरवीरांच्या भूमीत प्रवेश

palkhi
लोणंद – लाखो वैष्णवांचा दळभार घेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवती श्री ज्ञानराज माऊलींनी निरा स्नानानंतर शूरवीरांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.

सकाळी साडेसहा वाजता महर्षि वाल्मिकीच्या नगरी वाल्हे गावाचा निरोप घेऊन माऊली लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाल्या. पिंपळे खुर्द येथे सकाळचा विसावा व न्याहरी घेऊन दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी माऊली निर्‍याकडे मार्गस्थ झाल्या. सकाळी अकरा वाजता हा सोहळा निरा नदीच्या तिरावर पोहोचला. दुपारचे भोजन व विश्रांतीनंतर अडीच वाजता हा सोहळा निरा स्नानाकडे मार्गस्थ झाला. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. सर्वांना पावसाची प्रतिक्षा होती. परंतू आळंदीपासून निरा पर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने वारकर्‍यांसह शेतकर्‍यांनाही चिंता लागून राहिली होती.

दुपारच्या भोजन व विश्रांतीनंतर माऊलींचा सोहळा दुपारी दीड वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. नीरा नदी पार केल्यानतर पालखीतून माउलींच्या पादूका श्री गुरू हैबतबाबांचे वंशज व सोहळ्याचे मालक राजाभाउ आरफळकर यांच्या हातात देण्यात आल्या. संस्थानचे विडस्त डॉ.प्रशांत सूरू यांच्या समवेत माउली माउली नामाचा जयघोष करत या पादुका नीरा स्नानासाठी दत्तघाटावर आणण्यात आल्या. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दत्तघाटाचा परिसर स्वच्छ केला होता. त्यावर राजश्री राजेंद्र झुन्नरकर या तरूणीने रांगोळ्याच्या आकर्षक पायघड्या केल्या होत्या. पोलिस बंदोबस्तात माउलींच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आले. दरवर्षी दुथडी भरून वाहणारी नीरा यंदा मात्र दुष्काळामुळे नदीला थोडेच पाणी होते. याच पाण्यात माउलींच्या पादुकांना नीरास्नान करण्यात आले. श्री ज्ञानदेवांनी आज दत्त घाटात नीरा स्नान करून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. इंद्रायणी आणि चंद्रभागा या दोन्ही नद्या व्यतिरिक्त माऊलींचे फक्त नीरा नदीतच स्नान होते. माऊलींच्या आजच्या स्नानाने जाणू निराच आज आज पावन होऊन गेली. नीरास्नानानंतर पुन्हा पादूका रथातील पालखीत ठेवण्यात आल्या आणि सोहळा सातारा जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.

श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक श्री.गूरू हैबतबाबा पवार आरफळकर यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे पालखी सोहळ्याने दूपारी सव्वा दोन वाजता प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.एम.रामास्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, यांच्यासह असंख्य जिल्हावासियांनी ज्ञानराजांसह पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. पाडेगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे झांज पथकाचे स्वागत स्विकारून हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला.

माऊली लोणंदकडे, पुणेकरांचा निरोप
गेल्या आठवडाभरापासून पुणे जिल्हा हद्दीतून जाणार्‍या माऊलींसह लाखो वारकर्‍यांना पुणेकरांनी निरोप दिला व सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी 5.30 वाजता हा सोहळा लोणंद मुक्कामी पोहोचला. समाज आरतीनंतर हा सोहळा अडीच दिवसांच्या लोणंद मुक्कामी विसावला.

Leave a Comment