बगदाद- अमेरिकेतील एका मानवाधिकार संस्थेने इराकमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या १६० ते १९० जणांची हत्या केल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांनी केली ४ दिवसात १६० जणांची हत्या
इराकमधील तिक्रित येथे ११ ते १४ जून दरम्यान इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट या दहशतवादी संघटनेने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १६० ते १९० जणांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
दहशतवाद्यांनी इराकमधील मोसूल आणि तिक्रित या दोन शहरांचा ताबा घेतल्यानंतर शेकडो नागरिक आणि इराकी सैन्यातील जवानांची हत्या केली. दहशतवाद्यांनी वेबसाईटवरुन प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमुळे हे उघड झाले आहे. यात जवानांचे हात मागे बांधून त्यांना ट्रकमध्ये कोंबून अज्ञातस्थळी नेऊन ठार मारुन नंतर त्यांचे विविध छायाचित्र वेबसाईटवर टाकण्यात आले आहेत. सदर छायाचित्र आणि उपग्रहांद्वारे उपलब्ध झालेल्या छायाचित्रांमुळे मोसूल आणि तिक्रित शहरात दहशतवाद्यांनी अत्याचाराचा निर्घृण कळस गाठल्याचे दिसून येते, असे अमेरिकेतील मानवाधिकार संस्था वॉच चे संचालक पिटर बौक्काएर्ट यांनी सांगितले.
दहशतवाद्यांनी प्रसारीत केलेली छायाचित्रे खरी असल्याचे इराक सैन्य दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल कासिम अल मौस्सावी यांनी सांगितले.सुमारे १७० सैनिकांना दहशतवाद्यांनी मारल्याची कबुलीच मौस्सावी यांनी दिली.