कांद्याची कृत्रिम टंचाई , साठेबाजांवर तातडीने कारवाई करा ;विनोद तावडे

vinod-tawade
मुंबई – सध्या बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या कांद्याच्या कृत्रिम साठेबाजीमुळे कांद्याचे भाव भडकले आहेत. एपीएमसीमधील अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या साटेलोट्यामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. ही टंचाई रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले असून या प्रकरणी सरकारने तातडीने लक्ष घालून साठेबाजांवर कडक कारवाई करून शेतकरी व जनसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी विधान परिषद विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे .

मान्सून महाराष्ट्रात अद्यापही दाखल न झाल्यामुळे जुन महिना पूर्णपणे कोरडा गेला. सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा हा नुकत्याच संपलेल्या हंगामातील आहे. त्यामुळे कोरड्या जून महिन्यामुळे बाजारपेठेतील कांद्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. केवळ साठेबाजांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे कांद्याची भाववाढ होत आहे. या साठेबाजांवर कडक कारवाई केल्यास ऑगस्टअखेरपर्यंत कांद्याचे भाव वाढणार नाहीत. त्यामुळे या साठेबाजांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे लेखी पत्र पाठवून केली आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

गारपिटीमुळे या हंगामातील कांद्याची गुणवत्ता जरी खराब झाली असली तरी या गारपिटीमुळे कांद्याच्या उत्पन्नामध्ये विशेष परिणाम झालेला नाही, त्यामुळे हा कांदा १५ ऑक्टोबरपर्यंत नक्कीच टिकेल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला आहे.

या पूर्वीही अनेकवेळा कांद्याची भाववाढ झाली असून ही भाववाढ रोखण्याबाबत सध्याच्या केंद्र सरकारकडून काही प्रभावी उपाययोजना राबविल्या असल्यास त्या उपाययोजनांची माहिती आम्हाला देण्यात यावी तसेच मागील यु पी ए सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांच्या व्यतिरिक्त राज्यसरकारला काही नवीन उपाययोजना सुचवायच्या असल्यास त्याची माहिती आम्हाला द्यावी, जेणेकरून केंद्रसरकारशी योग्य समन्वय साधता येईल आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व सामान्य जनतेवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करता येईल, असे आपण मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याची माहिती तावडे यांनी दिली.

Leave a Comment