३६४ दिवस राजकारण ,पण एक दिवस माऊलींचे नामस्मरण ;तावडे

vinod-tawade1
जेजूरी- माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मनाला एक सात्वीक आनंद आणि ऊर्जा मिळते व हीच ऊर्जा पुढे वर्षभर प्रेरणा देत असते असे उदगार विधानपरिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी येथे काढले.

श्री संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सोहळ्याला सकाळी जेजूरी ते वाल्हे असा प्रारंभ झाला. जेजूरी येथे ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखीची त्यांनी विधीवत पूजा केली व दर्शन घेऊन विनोद तावडे वाल्हेपर्यंत जाणाऱ्या पालखीमध्ये सहभागी झाले. ज्ञानबा तुकारामाचा गजर करीत आणि हाती टाळ,विणा घेत वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये विनोद तावडे वाल्हेपर्यंत वारकऱ्यांसमवेत पायी चालत होते. सकाळी 6 च्या सुमारास जेजूरी येथे ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे दर्शन घेवून दुपारी ही पालखी वाल्हे मुक्कामी पोहोचली. पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसमवेत ग्यानबा तुकारामाचे नामस्मरण करत हजारो वारकऱ्यांसमवेत त्यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.

वर्षाचे 364 दिवस राजकारण केल्यानंतर 1 दिवस माऊलीचे नामस्मरण करण्यात मनाला आनंद मिळतो. दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता आपण याठिकाणी येतो. त्याप्रमाणे आपण संघर्ष यात्रा, सुप्रशासन यात्रा यामध्ये सहभागी झालो त्यापेक्षा भक्तीरसामध्येआणि वारकऱ्यांच्या सोबत विठोबाचे नामस्मरण करत पायी चालत जाणे यामधील यात्रेमध्ये सहभागी होण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. या पालखीसोहळ्यात सहभागी होण्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते असेही त्यांनी सांगितले.

पंढरपूरच्या विठोबाच्या पारंपारीक पुजेचा मान हा नियमानुसार राजकीय व्यक्तींना मिळतो परंतू या विठोबाच्या पुजेचा मान हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

तावडे यांच्या समवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार बाळासाहेब भेगडे, भिमराव तापकीर आदी अनेक मंडळी सहभागी झाली होती.

Leave a Comment