सुरेश वाडकर यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा

suresh-wadkar
नाशिक – शहर पोलिसांनी प्रख्यात पार्श्‍वगायक सुरेश वाडकर आणि इतर दोन जणांविरोधात एका जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सुरेश वाडकर यांच्यासह विनायक धोपावकर व विजया करंदीकर या इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. नाशिकजवळच्या देवळाली कॅम्प भागातील एका जमीन व्यवहार प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे भद्रकाली पोलिस ठाण्यात कार्यरत एका अधिकार्‍याने सांगितले. भादंविच्या कलम १२० (ब) (फौजदारी स्वरूपाचा कट), ४०६ (विश्‍वासघात), ४२० (फसवणूक), ४६५ (धोखाधडी), ४६७, ४६८ (फसवणूक करण्याच्या इराद्याने धोका देणे) आणि ४७१ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश वाडकर यांचे एक भागीदार हेमंत कोठीकर यांनी वाडकर यांच्याविरोधात जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक केल्याची तक्रार न्यायालयात केली होती. या तक्रारीची दखल घेत दिवाणी न्यायालयाने बुधवारी सुरेश वाडकर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश बुधवारी पोलिसांना दिले होते, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार याचिकाकर्ते कोठीकर, सुरेश वाडकर आणि प्रख्यात गायक सोनू निगम यांनी १६ एप्रिल २००८ रोजी देवळाली कॅम्प परिसरातील जमीन खरेदी करण्याचा करार केला होता. जमिनीचे मालक राजेश दारगोडे व अजित दारगोडे यांच्याशी हा करार करण्यात आला आणि अग्रीम रक्कमही देण्यात आली होती. जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही वाद निर्माण झाल्यानंतर सुरेश वाडकर, सोनू निगम आणि कोठीकर या तिघांनी वादाचे निराकरण झाल्यानंतर पूर्ण पैसे देऊ, असे दारगोडे यांना सांगितले. दारगोडे बंधूंना जमिनीबाबत निर्माण झालेला वाद संपुष्टात आणण्यात अपयश आल्यानंतर या तिघांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे, असे कोठीकर यांचे वकील मंदार भानसे यांनी सांगितले. कोठीकर यांच्या मते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सुरेश वाडकर यांनी विनायक धोपावकर व विजया करंदीकर या जमिनीच्या मूळ मालकांशी संपर्क साधला आणि ७ फेब्रुवारी २०१३ रोजी संपत्तीचे हस्तांतरण केले. त्यामुळेच कोठीकर यांनी या तिघांविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे.

Leave a Comment