महिलांचे बीज स्वावलंबन अभियान

seed3
आपल्या देशातील गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांचे शोषण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत म्हणजे त्याला बियांच्या बाबतीत परावलंबी करणे. काही शेतकर्‍यांकडे एक एकर किंवा दीड एकर जमीन असते आणि त्या जमिनीत त्यांच्या पोटापुरतेही धान्य पिकत नाही. त्यामुळे त्यांचे त्या जमिनीकडे दुर्लक्ष असते. ते ती जमीन म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने कसत नाहीत. त्यामुळे पाऊस पडला की, मिळेल ते बी हाताशी घेऊन ते पेरतात.
ते सुद्धा बी त्यांच्याकडे नसते. तेव्हा ते श्रीमंत शेतकर्‍यांकडून बी उसने घेतात. वास्तविक पाहता अशा बियांची विक्री जास्त किंमत घेऊन केली जात असते. कारण ते बियाणे विशेष काळजी घेऊन जतन केलेले असते. जास्त किंमत असल्यामुळे हा अत्यल्प भूधारक आणि मुख्यत्वे शेतमजुरी करून जगणारा शेतकरी ती किंमत देऊन बियाणे विकत घेऊ शकत नाही. अशा वेळी अडवाअडवी करून बियाणांच्या बदल्यात येणार्‍या पिकांमध्ये चार आणे हिस्सा ठेवला जातो. म्हणजे केवळ हाताशी बियाणे उपलब्ध नाही एवढ्या एका कारणासाठी त्या शेतकर्‍याला आपल्या पिकातला २५ टक्के हिस्सा त्या श्रीमंत शेतकर्‍याला देणे भाग पडते. हे एक प्रकारचे शोषणच आहे.

मात्र आंध्र प्रदेशातल्या मेदक जिल्ह्यातील काही अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक महिलांनी या शोषणाविरुद्ध आणि त्यातून निर्माण होणार्‍या दारिद्य्राविरुद्ध बंड पुकारले. यातल्या बहुसंख्य महिला दलित समाजातल्या होत्या. म्हणून त्यांनी आपल्या संघटनेचे नाव सुद्धा दलित महिला संघटना असे ठेवले आणि बियाणे स्वातंत्र्याचा उद्घोष केला. संघटित ताकदीच्या जोरावर या महिलांनी बीज बँक स्थापन केली. त्याचबरोबर केवळ देशी बियाणे वापरण्याचा निर्धार करून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये बीज क्रांती आणि शेती क्रांतीचा प्रचार सुरू केला. त्यातूनच अनेक महिलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. या संघटनेतर्ङ्गे दरवर्षी संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत बीज यात्रा काढली जाते. या यात्रेमध्ये २०-२५ बैलगाड्या सहभागी झालेल्या असतात. या बैलगाड्यांसोबत या महिला संघटनेच्या सदस्या मेदक जिल्ह्यातल्या विविध गावांना भेटी देतात. त्या बैलगाड्यांमध्ये भांडी ठेवलेली असतात आणि त्या भांड्यांमध्ये नाना प्रकारची बियाणी ठेवलेली असतात. आपल्या देशामध्ये संकरित बियाणांचा वापर सुरू झाल्यापासून बरेच देशी बियाणे नष्ट झालेले आहे. असे नष्टप्राय होत चाललेले बियाणे गावागावातून जमा करून त्यांची देवाणघेवाण वाढवून देशी बियाणांची संख्या वाढविण्याचा उपक्रम या यात्रेतून केला जातो.

या संघटनेच्या काही सदस्या बियाणे बँकेच्या स्थापनेपूर्वी अक्षरश: भीक मागून खात होत्या. पण आज त्याच महिला देशी बियाणे आणि सेंद्रीय शेती यांच्या जोरावर वीस-वीस एकर जमिनीच्या मालक झालेल्या आहेत. हजारो रुपये कमवणारे व्यवसाय करत आहेत. हे सारे बियाणांच्या क्रांतीतून घडलेले आहे. या महिला २० बैलगाड्यांचा काङ्गिला घेऊन जिल्हाभर ङ्गिरतात. त्या गाड्यांच्या सोबत वाजंत्री असते. महिला गाड्यांच्या समोर नाचत असतात. आपल्या देशात कोरडी भाषणे करून समाज जागृती होणार नाही. ती अशी बँडच्या तालावर आणि नाचून गाऊन करावी लागेल. या महिला तेच काम करीत आहेत आणि त्यातून आपल्या देशातले बियाणे वाचवण्याचा संदेश देत आहेत. त्या या मार्गाला का लागल्या आहेत. सरूपम्मा नावाच्या महिलेचा अनुभव ऐकू या. त्यांच्या भागात १९५० च्या काळात ज्वारी आणि अन्य भुसार पिकांच्या ७० ते ८० जातींचे बियाणे वापरात होते. पण नंतर सुधारित बियाणांच्या नावावर अनेक नवी हायब्रिड बियाणी आली आणि जुन्या बियाणांचा वापर कमी होत गेला. काही काही लोकांनी असे बियाणे जपून ठेवले होते. आता त्या लोकांकडून ते बी आम्ही विकत घेतो आणि तेच या बियाणे यात्रेत सोबत घेऊन जातो.

seed3
गावा गावात काही लोकांना ते बियाणे वापरण्याचा आग्रह करतो. ज्यांना ते बी दिले जाते त्यांनी ते सव्वा पटीने या बीज बँकेला पुढच्या वर्षी परत करावे असा नियम आहे. असे करीत गेल्याने बीज बँकेत सगळ्या वाणांचे बी वाढत गेले. आता कोणतेही जुने बियाणे दुर्मिळ राहिलेले नाही. आता या महिलांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे.त्यांना आता ही बँक बियाणे देणार नाही. प्रत्येक गावातल्या शेतकर्‍यांनी आपापल्या गावात असेच बियाणे संकलित करण्याचा उपक्रम करावा आणि गावातच बीज बँक तयार करावी असे सर्वांना सांगितले आहे. आता संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत ङ्गिरणारी ही बीज यात्रा गावात आली की यात्रेतल्या गाड्यांत ठेवलेले एखाद्या वाणाचे बी त्या गावातच उपलब्ध नसेल किंवा त्या गावात एखादे जुन्या वाणाचे बी सापडले असेल तर अशाच बियाणांची केवळ देवाण घेवाण होते आणि आणखी बियाणे गावात आणि बँकेत जमा होत रहाते. मेदक जिल्ह्यातल्या इडकुलपल्ली गावची ही सरुपम्मा हे सारे का करीत आहे? कारण आपल्या भागातल्या देशी वाणांनी तिची स्थिती बदलली आहे. अन्य लोकांचीही स्थिती बदलावी असे तिला वाटते म्हणून ती हा सारा आटापिटा करीत आहे.

ती महिनाभर गावोगाव ङ्गिरत असते. तिच्याकडे दोन एकर जमीन होती. ती एका साडीवर वर्ष वर्ष काढत असे. तिला आणि तिच्या कुटुंबाला दोन वेळचे पोटभर जेवण ही चैन वाटत होती पण तिने ११ वर्षांपासून या उपक्रमात भाग घेतला आणि आता तिची स्थिती बदलली आहे. तिने आपल्या शेतात कोणतेही हायब्रिड बियाणे वापरायचे नाही असा निर्धार केला आहे. ती रासायनिक खते वापरत नाही आणि जंतुनाशके वापरत नाही. ती वापरण्याची वेळ आलीच तर ती सेंद्रीय औषधे वापरते. देशी शुद्ध बियाणे, सेंद्रीय खते यांचा वापर करण्याने आपले दारिद्य्र हटले आहे असे तिचे म्हणणे आहे. शुद्ध बियाणाची लागवड करणे म्हणजे काळ्या आईची पूजा करणे होय असे तिचे म्हणणे आहे. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या स्थितीत ङ्गार मोठे परिवर्तन झाले आहे. चंद्रम्मा या महिलेची स्थिती तर आणखीच वेगळी आहे. तिने देेशी वाण आणि सेंद्रीय शेती यातून आपली उपासमारीतून सुटका करून घेतली आहे. तिच्याकडे एकच एकर रान आहे पण ती त्या जमिनीत १२ प्रकारची पिके घेते. ही पद्धत आपण विसरलो आहोत पण तिच्या साह्याने ती दरसाल एक एकर जमीन विकत घेत आहे.

Leave a Comment