नीरा स्नानानंतर माऊलींचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

neera
वाल्हे – टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात तपोनिधी महर्षि वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दुपारी 12.30 वा. आगमन झाले. उद्या दि.27 रोजी निरा स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.

पहाटे माऊलींची महापूजा झाली. त्यानंतर खंडोबारायांची जेजूरीनगरी सोडून माऊली सकाळी 6.30 वा. वाल्हेकडे मार्गस्थ झाल्या. माऊलींसह आलेल्या लाखो भाविकांनी महाराष्टाचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबाचे दर्शन घेतले. 12 कि.मी. चा प्रवास असल्याने व दुपारपर्यंत पोहोचण्याचे असल्याने वैष्णवांची पावले वाल्हे गावाच्या दिशेने झपझप पडत होती. सकाळी 8.30 वाजता सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला. सह्याद्रिच्या पर्वतरांगात दौंडज खिंडीत वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली. सकाळी 9 वा. हा सोहळा दौंडजकडे मार्गस्थ झाला. दौंडज येथे ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. या माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी 11 वाजता हा सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. माऊलींच्या स्वागतासाठी वाल्हे नगरीत घराघरावर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. दुपारी 12 वा. माऊली वाल्हे नगरीत आल्या. येथे सरपंच, उपसरपंच व असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले. येथे पालखी रथातून खाली उतरवण्यात आली व खांद्यावरून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणेनंतर दुपारी 12.30 वाजता माऊलींना रथात विराजमान करण्यात आले. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत सोहळा पालखी तळाकडे मार्गस्थ झाला. या वाटचालीत पठाणवस्ती येथे माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला त्यावेळी माया चॅरिटेबल फौंडेशन व श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती टस्ट पुणे यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले तर राजराजेश्‍वर सेवा भावी टस्ट, पुणेचे अध्यक्ष विजयभाऊ कोल्हापूरे व रणजित गणराया मंडळ, पुणेचे अध्यक्ष बाबासाहेब कोल्हापूरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्यावतीने वारकर्‍यांना मोफत चहा वाटप करण्यात आले.
नवीन पालखी तळावर दुपारी 1.30 वाजता माऊलींचे आगमन झाले. पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी पालखी तळावर पोहोचल्यानंतर समाजआरती घेतली जाते. सोहळ्यात केवळ वाल्हे येथे दुपारी पालखी पोहोचल्यानंतर समाजआरती घेण्यात येते. येथे माऊलींचे विडरूप दर्शन पहावयास मिळते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 2 वाजता माऊलींची पालखी माऊली माऊलीच्या जयघोषात समाजआरतीसाठी मध्यभागी आणण्यात आली. दुपारी 2 वाजता आरतीला सुरूवात झाली. येथे माऊलींची व तुकोबारायांची आरती घेण्यात आली. यावेळी लाखो भाविक उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा उद्या (गुरूवार) दि.7 रोजी सकाळी 6.30 वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सकाळी हा सोहळा 11.30 पर्यंत नीरा येथे पोहोचेल. दुपारचा नैवेद्य व भोजन घेऊन विश्रांतीनंतर दुपारी अडीच वाजता हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ होईल. नीरा स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.

Leave a Comment