मुंबई – तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात मुंबईत धडाक्याने उड्डाण पूल उभारण्याला सुरुवात केली होती. पण आता केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री झाल्यावर मुंबईतल्या जलवाहतुकीच्या विकासासाठी ते सज्ज झाले आहेत. राज्य सरकारकडून मुंबईत जलवाहतूक शक्य होत नसेल तर केंद्र सहकार्य करणार असल्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून मुंबईत जलवाहतूक शक्य नसल्यास केंद्र सहकार्य करणार – नितीन गडकरी
पंतप्रधान जलमार्ग योजना केंद्र सरकार सुरू करत असून, या अंतर्गत मुंबईतल्या जलवाहतुकीचा विकास केला जाईल. मरिन ड्राईव्हच्या समुद्रात ५०० रुम्सचे एक आलिशान ह़ॉटेल उभारण्याचा प्रस्ताव असून चार फ्लोटिंग रेस्टॉरंट आणि ल्फोटिंग हेलिपॅडचाही प्रस्ताव असल्याचे गडकरींनी सांगितले आहे. तसेच गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेडिओ क्लबच्या बाजुला नवीन जेट्टीचा प्रस्ताव असल्याचीही माहिती त्यांनी दिली. बीपीटीच्या अंतर्गत असलेल्या १८०० एकरच्या जमिनीचा विकास करण्यासाठी एक समितिची स्थापन केली जाणार असल्याचेही गडकरींनी पत्रकार परिषदेत सांगितले.