राज्यावर यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट ?

duskal
पुणे – मान्सूनने अजूनही हुलकावणी दिल्याने महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट पडण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यात अजूनही पावसाने राज्यात दमदार हजेरी लावलेली नाही , परिणामी 2011, 2012 या दोन वर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर मागील हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता पुन्हा पाणी ,धान्य चारा याची स्थिती गंभीर होऊ शकते,असे अभ्यासकांचे मत आहे.

कृषितज्ज्ञांच्या मते 15 जुलैपर्यंत पावसाने हजेरी लावल्यास खरीप हंगाम वाचण्याची शक्‍यता आहे. अन्यथा खरीप वाया जाण्याबरोबरच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

मृग नक्षत्र उलटूनही महाराष्ट्रात कुठेही पावसाचा थेंब पडलेला नाही.यंदा पंढरीच्या वारीवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. वारीत यंदा वारकर्यांची संख्या निम्म्याने घटली असून पावसाची आतुरतेने बळीराजा वाट पाहत आहे. राज्यात सर्वत्र पेरणीसाठी तयार होऊन पडलेली शेते, भकास माळराने व बोडखे डोंगर, पाण्याने तळ गाठलेली धरणे आणि विहिरी, भयंकर दुष्काळाच्या भीतीने हवालदिल झालेला शेतकरी, हे चित्र सद्यस्थितीत आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पिण्याचे पाणी व चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.असे कृषीतज्ञांचे म्हणणे आहे. यंदा हवामान विभागानेच पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मॉन्सून दाखल झाला खरा; पण त्यात जोर नाही. आषाढी एकादशीला पाऊस येतोच, असा अनुभव असल्याने आता सर्वांच्या नजरा तिकडे लागल्या आहेत. 2011, 2012 या दोन वर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर मागील हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा कोरड्या दुष्काळाचे सावट राज्यावर आहे.

Leave a Comment