मल्हारी घरी माऊली आली, वारी बेल भंडार्‍यात न्हाली

mauli
जेजूरी – वारी हो वारी । देई का गां मल्हारी ॥
त्रिपूरीरी हरी । तुझ्या वारीचा मी भिकारी ॥
सोपानदेवांच्या सासवड नगरीचा निरोप घेवून जेजूरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जेजूरी नगरीत आगमन होताच जेजूरीवासियांनी बेल भंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
पहाटे श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानच्यावतीने माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा करून हा सोहळा सकाळी जेजूरीकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा 8.45 वाजता बोरावके मळा पोहोचला. येथे वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी घेतली. सकाळी सव्वा नऊ वाजता सोहळा दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी यमाई शिवरीकडे मार्गस्थ झाला. दरवर्षी सोहळ्यात बोरावके मळा येथे हिरवीगार फळा फुलांची दिसणारी राने यावर्षी मात्र उजाड माळरान वाटत होती. अशा उजाड वातावरणातच सोहळा सकाळी सव्वा अकरा वाजता यमाई शिवरी येथे पोहोचला. येथे वारकर्‍यांनी भोजन व विश्रांती घेतली. दुपारी 2 वाजता सोहळा भोजन व विश्रांतीनंतर जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी 3.30 वाजता तो साकुर्डे येथे पाहेाचला. जेजूरीसमीप येताच दिंड्यादिंड्यांमधून मल्हारीचे गुणगान करणारे संतांचे अभंग गायले जात होते. वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. टप्पा लहान असल्याने वारकरी न थकता मार्गक्रमण करीत होते. जेजूरीनगरीत माऊलींचे अश्‍व सायंकाळी 4.45 वाजता तर पालखी सोहळा सायंकाळी 5.15 वाजता जेजूरी हद्दीत पोहोचला. जेजूरीचे नगराध्यक्ष अविनाश भालेराव, उपाध्यक्ष जयदीप बारभाई व नगरसेवक व नगरवासियांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत सोहळ्याचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. त्यानंतर सोहळा जेजूरी नाक्याजवळ पोहोचला. कॉर्नरवर सोहळ्याचे स्वागत मल्हारी मार्तंड देवस्थान समितीच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड.किशोर म्हस्के, विश्‍वस्त डॉ.प्रसाद खंडागळे, अ‍ॅड.दशरथ घोरपडे, अ‍ॅड.वसंत नाझीरकर, संदिप घोणे, माजी आमदार अशोकराव टेकवडे यांच्यासह विश्‍वस्त व भाविकांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करून केले. या बेलभंडार्‍यात माऊलींसह अवघे वैष्णवजन न्हाऊन निघाले होते. पिवळ्याधमक भंडार्‍यात माऊलींचा सोहळा सोन्यासारखा चमकत होता. येथील स्वागत स्विकारून सोहळा नवीन पालखी तळाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सव्वा सहा वाजता समाज समाज आरतीनंतर सोहळा जेजूरी मुक्कामी विसावला. उद्या हा सोहळा सकाळी वाल्हे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.

Leave a Comment