निकालाच्या प्रतीक्षेत भावी पोलिस उपनिरीक्षक !

seva
नागपूर – राज्यभरातील एकूण ७१५ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाचा अद्याप निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार चिंताग्रस्त बनले आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शारीरिक चाचणी न घेतल्याने उमेदवारांनी मैदानावर सराव करणेही सोडून दिले आहे.
राज्यभरातील एकूण ७१५ जागांसाठी पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा घेण्यात आली. ऑगस्टमध्ये पूर्वपरीक्षा व नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर काहीच दिवसात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एकूण ३ हजार ०१विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून शारीरिक चाचणी न घेताच उमेदवारांना ताटकळत ठेवण्यात आले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत असल्याने एका परीक्षेसाठी एक वर्ष उमेदवार देऊ शकत नाही. काही उमेदवार मात्र, न चुकता गेल्या सात महिन्यांपासून मैदानावर सराव करीत आहेत. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या मंत्रालय सहाय्यकाची पूर्वपरीक्षा डिसेंबर २०१३ मध्ये पार पडली.

फेब्रुवारीत मुख्य परीक्षा झाली. अंतिम निकाल लागून मंत्रालय सहाय्यक गेल्या चार जूनला रुजूही झाले. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाचा निकाल अद्याप घोषितच करण्यात आलेला नाही.

Leave a Comment