तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्याचा डाव उधळला

iraq2
बगदाद – इराकच्या मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आयएसआयएसने आज पुन्हा एकदा आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी शक्तिशाली केलेला हल्ला इराकी फौजांनी परतावून लावला. दरम्यान, आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी इराकमधील अर्ध्यापेक्षा जास्त शहरांवर कब्जा केला आहे.

आज नव्या जोमाने तेल शुद्धीकरण केंद्रावर ताबा मिळविण्यासाठी दहतवाद्यांनी हल्ला केला. सरकारी फौजांनी गेल्या आठवड्यातील हल्ल्याचा अनुभव लक्षात घेऊन या केंद्राची सुरक्षा अधिक कडक केली असल्याने दहशतवाद्यांचा डाव उधळला गेला. तथापि, दहशतवादी माघारी फिरले नाहीत. दहा हजारांच्या संख्येत असलेल्या दहशतवाद्यांनी आसपासच्या परिसरावर ताबा घेतला असल्याची माहिती सूत्राने दिली.

बगदादकडेही दहशतवादी कूच करण्याच्या तयारीत आहेत. इराकची राजधानी असलेल्या या शहरावरील आक्रमण रोखण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पराभूत करण्यासाठी इराकी फौजांनी धाडसी रणनीती तयार केली आहे. कुठल्याही स्थितीत बगदाद वाचविणे, हाच ध्यास पंतप्रधान नौरी-अल-मलिकी यांनी घेतला आहे. आमचे सैन्य काही भागांमध्ये कमजोर ठरले आहे. पण, आम्ही माघार घेतली नाही. लढा सुरूच राहील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

दरम्यान, सुन्नी अतिरेक्यांना नियंत्रित करण्यासाठी देशात राष्ट्रीय आपात्‌कालीन सरकार स्थापन करण्याची शक्यता इराकच्या पंतप्रधानांनी फेटाळून लावली आहे. अशा प्रकारचे सरकार स्थापन करणे म्हणजे घटनेचे आणि राजकीय प्रक्रियेचे उल्लंघन ठरेल, असे मलिकी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले.

Leave a Comment