मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्यात आले आहेत. भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू देत त्यांच्या जागी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बुधवारी सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला.
सुनील तटकरे गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माळ
मागील काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती होईल अशी चर्चा होती. तटकरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी भास्कर जाधव यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी तटकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला जितेंद्र आव्हाड यांनी अनुमोदन दिले. सुनील तटकरे कोकणातून येतात. ते रायगडच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीतेंकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील म्हणून ओळखले जातात. सुनील तटकरे यांनी २००४ पासून राज्यात विविध खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी संभाळली आहे. ते राज्याचे उर्जा मंत्री तसेच वित्त मंत्रीही होते. बेहिशोबी मालमत्ता जमवणे तसेच भ्रष्टाचाराचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत.