जागृती निर्माण करणारे कृषि तज्ञ

agro
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत येत गेला. त्याची कारणे शोधण्याचे खूप प्रयत्न झाले. शेतकर्‍यांना उत्पादन खर्च परवडत नाही, सरकारने भाव बांधून दिले पाहिजेत अशा अनेक प्रकारच्या मागण्या पुढे येत गेल्या. त्या काही प्रमाणात पुर्‍या झाल्या. परंतु शेतकरी तोट्यात का येतो, याची खरी कारणमीमांसा करण्यात अर्थतज्ञांना आणि कृषि तज्ञांना अजिबात यश आलेले नाही. अजूनही या तज्ञांच्या मार्गाने कारणमीमांसा करणारे लोक शेतकर्‍यांच्या तोट्याच्या बाबतीत अंधारातच चाचपडत आहेत. अशा काळामध्येच कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील खेडे या गावी श्री. मोहन शंकर देशपांडे यांनी या तज्ञांच्या घातक मार्गाचा त्याग करून शेतकर्‍यांच्या समस्यांची वेगळीच मीमांसा करायला सुरुवात केली. श्री. देशपांडे यांना स्वत:च्या शेतातील आणि इतर हजारो शेतकर्‍यांच्या शेतातील अनेक प्रयोगांच्या अंती शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे खरे कारण सापडले. आपली शेती हा एक जैवतंत्र शास्त्रीय व्यवसाय आहे आणि तो निसर्गाशी संवाद साधून तसेच निसर्गाने आपल्याला काय दिले आहे याचा विचार करून केला तर तो किङ्गायतशीर ठरतो या निष्कर्षाप्रत श्री. देशपांडे आले. ते स्वत: कृषि पदवीधर आहेत आणि त्यांनी कृषि अर्थशास्त्रीय दृष्टीने हे सिद्ध करून दिलेले आहे की, गांडूळ शेती आणि विचारपूर्वक केलेली निसर्गशेती हीच शेती करण्याची खरी पद्धती आहे.

जमिनीमध्ये हजारो जिवाणू असतात आणि या जिवाणूंची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी जैवतंत्रशास्त्रीय प्रक्रिया वेगवान आणि आपोआप घडत जाईल, म्हणून जमिनीतील विषाणूंची संख्या कशी वाढेल हे पाहिले पाहिजे. आपल्या जुन्या काळच्या ऋषींनी या गोष्टींचा साकल्याने विचार केेलेला होता. अनेक मंत्रांतून आणि श्‍लोकातून तो सांगितलेला सुद्धा आहे. परंतु आपले परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आपण विसरून गेलो आहोत आणि आधुनिकतेच्या नावाखाली पाश्‍चात्यांची भ्रष्ट नक्कल करून बाहेरून विकत आणलेली रासायनिक खते शेतात घालून जमिनीची नासाडी करत आहोत. तसेच अडचणीत आलो आहोत, असे श्री. देशपांडे यांचे अनेक प्रयोगाअंती झालेले मत आहे. म्हणूनच श्री. देशपांडे यांनी गांडूळ शेती आणि निसर्ग शेतीच्या प्रयोगाला स्वत:ला वाहून घेतले. स्वत:च्या उपस्थितीत अनेक शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये प्रयोग सुद्धा केले. त्या शेतकर्‍यांना आलेले अनुभव जगाला सांगितले. रासायनिक शेतीचा पुरस्कार करणार्‍या अनेक कृषि तज्ञांनी श्री. देशपांडे यांच्या या पद्धतीला विरोध केला. त्यांची टिंगल टवाळी सुद्धा केली. परंतु या तथाकथित तज्ञांना अजून तरी शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे कारण सापडलेले नाही. त्यामुळे श्री. देशपांडे यांच्या विचारांना महाराष्ट्रामध्ये व्यापक स्वीकृती मिळत गेली. सध्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय शेती, गांडूळ शेती या तंत्रांचा वापर करत आहेत. परंतु यासाठी महाराष्ट्रामध्ये झालेल्या जागृतीत श्री. देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे हे मान्यच करावे लागेल.

त्यांचे गाव खेडे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यात आहे. कोल्हापूरहून ते ८८ किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरहून खेडेला जाण्यासाठी निपाणी, संकेश्‍वर, गडहिंग्लजला या मार्गाने जावे लागते. खेडे हे गाव आजरा आणि गडहिंग्लज यांच्या मध्ये गडहिंग्लजपासून १६ कि.मी. अंतरावर आहे. त्यांनी तेथे श्री समर्थ शेती संशोधन केंद्र स्थापन केले असून अनेक प्रकारचे प्रयोग यशस्वी केले आहेत. देशपांडे यांनी स्वत:ची एक पद्धत विकसित केली आहे. तिला त्यांनी ऋषि-कृषि देशपांडे कृषि तंज्ञ असे म्हटले आहे.

लातूरजवळचे निसर्ग शेती मुक्त विद्यापीठ

सेंद्रीय शेती आणि निसर्ग शेतीच्या प्रसारामध्ये महाराष्ट्रात अतिशय व्यापक प्रयत्न करणारे कार्यकर्ते म्हणून लातूरचे श्री. संदिपान बडगिरे यांचा अवश्य उल्लेख करावा लागेल. लातूर ते नांदेड या मार्गावर लातूरपासून ५ कि.मी. अंतरावर सोनवती या गावी श्री. बडगिरे यांचे निसर्ग शेती मुक्त विद्यापीठ आहे. श्री. बडगिरे हे महाराष्ट्रातले नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत. १९७२ सालपासून त्यांनी युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते म्हणून कार्य केलेले आहे. १९८७ सालपर्यंत त्यांनी या संघटनेचे कार्य हिरीरीने केले. १९८८ पासून त्यांनी आपल्या घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि अभ्यासूपणे रासायनिक शेती करायला लागले. या शेतीमध्ये होणारा खर्च, होणारे उत्पन्न आणि त्याचे होणारे परिणाम या सार्‍यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला, निरीक्षणे मांडली. १९८८ ते १९९३ अशी सहा वर्षे ते ही विघातक शेती करत राहिले. मात्र १९९३ साली श्री. अ. दाभोळकर यांची काही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. तसेच बळीराजा मासिकात जपानी निसर्ग शेती तज्ञ ङ्गुकोओका यांच्या ‘एका काडातून क्रांती’ या पुस्तकाची माहिती वाचायला मिळाली आणि १९९३ साली त्यांनी आपल्या शेतीची पद्धत बदलून सेंद्रीय शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला तीन-चार वर्षे थोडे उत्पन्न कमी झाले. पण ९७-९८ सालपर्यंत सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचा कस वाढला आणि तेव्हापासून उत्पादन वाढायला सुरुवात झाली.

असा रोकडा अनुभव आल्यामुळे श्री. संदिपान बडगिरे यांनी २००० सालपासून आपला अनुभव लोकांना सांगितला पाहिजे या तळमळीने लातूर जिल्ह्यात लातूर जिल्हा निसर्ग शेती मंडळ स्थापन केले आणि महाराष्ट्रभर याचा प्रचार करण्यासाठी निसर्ग शेती अभियान समिती स्थापन केली. त्यांनी महाराष्ट्रभर ङ्गिरून या पद्धतीच्या शेतीचा प्रचार केला. ३० जानेवारी २००५ रोजी त्यांनी सोनवती या गावी राज्य पातळीवरील निसर्ग शेती अधिवेशन घेतले आणि या अधिवेशनातच निसर्ग शेती मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. हे मुक्त विद्यापीठ दर महिन्याच्या तिसर्‍या रविवारी उघडे असे आणि त्यात शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीचे प्रात्यक्षिकासह ज्ञान दिले जात असे. बर्‍याच विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे काम थांबवलेले आहे. परंतु या विद्यापीठात सेंद्रीय शेतीचे प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांची माहिती जमा करून ठेवलेली आहे.

श्री. संदिपान बडगिरे यांनी आपल्या शेतामध्ये सेंेंद्रीय शेती, निसर्ग शेती, ङ्गळबागायती, जलसंधारण आदि अनेक प्रयोग केले आहेत. निसर्ग शेती हे केवळ शेतीचे तंत्र नाही, ती एक जीवनपद्धती आहे आणि महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे शेतकर्‍यांचे जीवन सुंदर असते या विधानाचा अनुभव निसर्ग शेतीमध्ये येत असतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सुधारित शेतीच्या नावाखाली आपण ज्या ज्या विपरीत गोष्टी केल्या आहेत त्या सर्व टाळून त्या सर्वांना पर्यायी अशी पद्धत बडगिरे यांनी विकसित केली आहे आणि त्या सर्वांच्या साह्याने आपल्या गावात अनेक प्रयोग सुद्धा केले आहेत. त्यामध्ये पाण्याचा मर्यादित वापर, चराई बंदी, कुर्‍हाड बंदी, पाणलोट क्षेत्र विकास, गोवंश संवर्धन, शाकाहार, जंगल वाढ, प्रदूषण मुक्ती अशा कितीतरी प्रयोगांचा समावेश आहे. त्यांनी ‘स्वावलंबी शेती स्वावलंबी गाव’, ‘विनाश टाळण्यासाठी आनंदी जीवनासाठी’ अशी दोन पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या पत्नी निशाताई यांनी याच मंडळातर्ङ्गे आकुजा हे आयुर्वेदिक औषध तयार केलेले आहे. या दोघांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. एकंदरीत हे दांपत्य शोषणरहित ग्रामोद्योगप्रधान समाज निर्मितीचा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत. ज्या शेतकर्‍यांना लातूर जवळ पडते त्यांनी श्री. बडगिरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ङ्गायदा घेतला पाहिजे.

Leave a Comment