कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात केंद्र सरकारची चर्चा सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प बंगालमध्ये
राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाचे सल्लागार एस.पी. गोंचौधुर्य यांनी पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात २५० मेगावॅटचा प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले.
मोठ्या प्रमाणात पुरुलिया जिल्ह्यात जागा उपलब्ध आहे. सध्या वॉटर पंपिंग प्लँटच्या जवळची जागा राज्य सरकार शोधत असल्याचे गोंचौधुर्य यांनी सांगितले. केंद्र सरकारला या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल पाठवला असल्याचे ते म्हणाले.
या प्रकल्पाला जर केंद्र सरकारची मंजूरी मिळाली तर हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प ठरेल. या प्रकल्पातून दिवसा सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाण्याचा उपसा केला जाईल आणि रात्रीच्या वेळी पाण्याच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल, अशी या प्रकल्पाची कल्पना असल्याचे गोंचौधुर्य यांनी सांगितले.