काँग्रेसचे भाडेवाढीविरोधात राज्यात ‘रेल रोको’ आंदोलन

rail-roko
मुंबई- काँग्रेसने रेल्वे भाढेवाढीविरोधात आक्रमक पवित्रा घेत बुधवारी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी रेल्वे अडवून निषेध व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी १० ते ११च्या दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा आणि अकोला येथे रेल्वे गाड्या अडवून हे आंदोलन यशस्वी केल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. या आंदोलनात महिला वर्गानेही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.

नोकरी करणा-या मुंबईकर चाकरमान्यांना त्रास होणार नाही याचा विचार करुन आम्ही दुपारी ११ ते १२ या दरम्यान मुंबई-ठाण्यात उपनगरीय गाड्या अडवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केल्याचे सावंत यांनी सांगितले. केंद्र सरकारच्यावतीने मंगळवारी दरवाढ कमी करण्याची केलेली घोषणा फसवी असून ही दरवाढ पूर्ण रद्द करण्यात यावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे, सावंत यांनी सांगितले
ठाणे-वाशी हार्बर मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेरुळकडे जाणारी लोकल अडवली. यामुळे या मार्गावरील वाहतून सुमारे अर्धा तास ठप्प होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाडेवाढी विरोधात आंदोलन करणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
भाडेवाढ पूर्ण रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. २७ जूनला राज्यातल्या महायुतीच्या खासदारांच्या घरासमोर काँग्रेस घेराव आंदोलन करणार आहे.

Leave a Comment