नाशिक – गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही अखेर हात टेकले आहेत. हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची सध्यातरी कुठलीही शक्यता नसल्याचे मनोहरपंतांचे स्पष्ट मत झाले आहे.
उद्धव-राज एकोपा; पंतांनी टेकले हात!
महाराष्ट्रासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र येणे ही बाब अतिशय आशादायी राहील. या दोन्ही भावांनी एकत्र यावे, असे शिवसेना आणि मनसेच्या बहुतेक सर्वच कार्यकर्त्यांनाही मनापासून वाटते. या दिशेने मी अनेकदा प्रयत्न केलेत. पण, त्यांच्यात मनोमिलन घडून येण्याची शक्यता फार कमी आहे, असे मला वाटते. त्यामुळे मीदेखील आता आपले प्रयत्न थांबविले आहेत, असे लोकसभेचे माजी सभापती राहिलेले मनोहर जोशी यांनी सांगितले.
मनोहर जोशी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नाच्या उत्तरात जोशी म्हणाले की, ‘‘बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक शिवसैनिकांचे दैवत आहे. पण केंद्रात सत्तांतर झाले म्हणून राज्यात होईल असे समजून चालता येणार नाही. व्यक्तीकेंद्रीत हा मुद्दा सर्वांनाच लागू पडतो, असे मुळीच नाही.’’
महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्याने आपण ही निवडणूक लढणार आहात काय, असे विचारले असता, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मी उमदेवार म्हणून उतरणार नाही. तर पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.