साक्षीदाराची पलटी; सलमानला ओळखण्यास नकार

salman
मुंबई – सलमानच्या ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी आज (मंगळवारी) एका साक्षीदाराने पोलिसांना दिलेली साक्ष बदलली आहे. वांद्रे येथे झालेल्या अपघातानंतर गाडीतून चालकाच्या जागेवरून उतरून सलमानला पळताना आपण पाहिलेच नाही असे म्हणत, साक्षीदाराने सलमानला ओळखण्यास नकार दिला आहे .

नीलसागर हॉटेलमध्ये सुरक्षारक्षक असलेल्या सचिन कदमने आज न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर साक्ष दिली. त्यात तो म्हणाला की, सलमान गाडीतून चालकाच्या जागेवरून बाहेर आला आणि त्यानंतर त्याने तेथून पळ काढला हा पोलिसांकडे नोंदविण्यात आलेला आपला जबाब चुकीचा आहे. तत्पूर्वी, या साक्षीदाराने सलमानला चालकाच्या जागेवरून बाहेर पडून पळताना पाहिले होते असा जबाब पोलिसांकडे नोंदविला होता. मात्र, सचिनने आता आपली साक्ष बदलली आहे. त्यामुळे याप्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. उलटतपासणी दरम्यान सचिन म्हणाला की, अपघाताच्यावेळी मी हॉटेलच्या गेटवर पहारा करत होतो. मला जोरात आवाज ऐकू आल्यानंतर मी घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी एका गाडीने दुकानाला धडक दिल्याचे मी पाहिले. या अपघातात जखमी झालेला अजून एक साक्षीदार मोहम्मद शेख याने सलमानला ओळखले आहे. फिर्यादी वकिलांच्या बाजूने साक्ष देत त्याने सलमानने अपघातानंतर तेथून पळ काढल्याचे सांगितले. “अपघातात बचावल्यानंतर मी सलमानला पाहिले. त्याच्यासोबत अजून दोन व्यक्ती होत्या. पण मी त्यांना ओळखू शकलो नाही, अशी मोहम्मद शेख म्हणाला.

२८ सप्टेंबर २००२ साली दारूच्या नशेत गाडी चालवताना वांद्रे येथील पदपथावर झोपलेल्या व्यक्तींना सलमान खानने गाडीखाली चिरडल्याबाबत सलमानवर खटला सुरु आहे.

Leave a Comment