सत्त्वगुणांची पूजा होणारच

cow
हिंदू धर्मीय लोक गायीला देवता मानतात. तिची पूजा करतात, तिच्या मूत्राचे प्राशन करतात. हा शुद्ध वेडेपणा आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते. पण ती गोष्ट हिंदू धर्मातल्या कोणत्याही शंकराचार्यांच्या पचनी पडली नव्हती. कोणत्याही शंकराचार्यांनी आपल्या धर्मातली ही विसंगती दूर करण्याचा प्रयत्न केला नाही पण द्वारकेच्या शंकराचार्यांना एका पुण्यवान माणसाची पूजा खटकली. त्यांनी साईबाबा हे माणूस असल्याने त्यांची पूजा करण्याचे कारण नाही असे जाहीर केले आहे. हिंदू धर्म जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव पाहतो मग तो माणसातही असणारच. तिथे तो आहे असे मानून त्याची पूजा केली तर हिंदू धर्माला बाट येण्याचे काही कारण नाही. ते दगडाचीही पूजा करतात. खरे तर दगडात देव नसतो पण तो त्यात आहे अशी श्रद्धा ते बाळगतात. हिंदू धर्माचा खरा आधार ही श्रद्धा हाच आहे. अन्य धर्मातल्या कोणी या श्रद्धास्थानांंना धक्का लावला की आपले मन दुखावते. गेल्या साठ सत्तर वर्षात हिंदू धर्मीयांनी साईबाबांना देव मानून त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला सुरूवात केली आहे. पण आता हिंदू धर्माचे सर्वोच आचार्य असलेले शंकराचार्यच त्या श्रद्धास्थानांना धक्का लावत आहेत.

साईबाबा हे देव नाहीत आणि त्यांची पूजा करण्याची काही गरज नाही, ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे वगैरे काही प्रतिक नाहीत असे प्रतिपादन द्वारकेच्या शंकराचार्यांनी काढले आहेत. या संबंधात बोलताना शंकराचार्यांनी साईबाबाच्या नावाचा धंदा चालला असल्याचाही आरोप केला आणि त्यांच्या नावावर पैसा लुटण्याचे काम चालले आहे असेही म्हटले. शंकराचार्यांच्या या प्रतिपादनात चार वादग्रस्त वाक्ये आहेत. ती सगळीच चुकीची आहेत असे काही म्हणता येत नाही. त्यांचा उहापोह आपण करणारच आहोत पण मुळात या शंकराचार्यांच्या या म्हणण्याला एवढी किंमत दिली पाहिजे का असा सवाल विचारावासा वाटतो. त्यांनी काही तरी निर्णय द्यावा आणि लोकांनी तो मानावा असे कधी झालेले नाही. ते धर्माचे प्रमुख म्हणवतात पण त्यांना तसे कोणी मानत नाही. हिंदू धर्म अनेक स्थित्यंतरांतून जात आहे. पण त्यातल्या कोणत्याही स्थित्यंतरात कोणत्याही शंकराचार्यांनी धर्माला बाहेर काढण्यासाठी काही काम केलेले नाही. हिंदू धर्माच्या प्रमुखांनी आपल्याला आपल्या मठांत बंद करून घेतले आहे आणि तिथे बसून ते नित्य कर्मे करीत असतात.

त्या बाबतीत ते कर्मठ आहेत आणि त्या कर्मकांडांच्या पलीकडे ते काही पहात नाहीत. तेव्हा हजारो हिंदू साईबाबांची पूजा करतात ते काही शंकराचार्यांनी सांगितली म्हणून करीत नाहीत आणि त्यांनी करू नका म्हटल्याने कोणी ती पूजा थांबवणारही नाही. या शंकराचार्यांच्या आज्ञा कोणी मानत नाही. या उपरही साई बाबांची पूजा करावी का यावर वाद होऊ शकतो. साईबाबा हे देव नाहीत असे शंकराचार्यांचे म्हणणे आहे. माणसाची पूजा करता कामा नये असे ते म्हणतात पण या निर्णयाला काही शास्त्राधार नाही. आपण राम, कृष्ण यंाची पूजा करतो पण ते तरी देव होते का ? तीही माणसेच होती. मग आपण त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना देव मानतोच ना ? शंकराचार्यांनी साईबाबाची पूजा करू नका म्हटले पण आता महाराष्ट्रात शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा संतांची भक्ती व्यापकपणे केली जात आहे. पण शंकराचार्यांनी या माणसांच्या पूजेला हरकत घेतलेली नाही. गजानक महाराज, साई बाबा आणि स्वामी समर्थ हे समकालीनच आहेत. शंकराचार्यांचा रोख साई बाबांवरच का आहे ?

साईबाबांच्या नावावर पैशाची लूट चालली आहे हे मात्र म्हणणे अगदी योग्य आहे. कारण केवळ साईबाबाच नाही तर हिंदूंच्या सगळ्याच देवांच्या तीर्थक्षेत्रात त्यांच्या नावाने अनेकांचा पैसा कमावण्याचा धंदा तेजीत सुरू आहे. शनि शिंगणापूर, त्र्यंबकेश्‍वर ही तर देवस्थाने आहेतच पण प्रति साईबाबा आणि प्रति बालाजी अशाही मंदिरांत धर्माचा धंदा जोरात आहे. अष्ट विनायक, दत्तात्रयांची ठिकाणे आणि अक्षरश: शेकडो ग्रामदैवते यांत करोडो रुपयांचे व्यवहार होत आहेत. भक्त या देवांना भक्तीने धन आणि सोने नाणे अर्पण करतात. भक्त देवाला म्हणून ते देतात ते देवाला न मिळता पुजार्‍यांनाच मिळते. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी चालणारा पैशाचा खेळ ही काही नवी गोष्ट नाही. फार पूर्वीपासून तो खेळ चालत आला आहे. असे असताना या गोष्टीवरून केवळ साईबाबांनाच दोष का द्यावा. उलट साईबाबाच्या शिर्डी संस्थानमध्ये आलेल्या पैशाचा तुलनेने चांगला उपयोग होत असतो. केवळ साई संस्थानच नाही तर अलीकडच्या शंभर दोनशे वषार्र्ंत पुढे आलेल्या सर्वच तीर्थक्षेत्रात पैसाही खूप येत आहे आणि या पैशाचा विनियोग समाजासाठी करण्याची प्रथाही वाढत आहे. या संस्थांनांनी रुग्णालये, शाळा सुरू केलेल्या आहेत. यातल्या बहुतेक तीर्थक्षेत्रात नाममात्र दरात किंवा मोफत भोजनाची सोय झालेली आहे. यातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रांच्या पैशातून कोणाचीही वैयक्तिक गुजराण होत नाही. शंकराचार्यांना यातल्या कोणत्याही गोष्टीचा सुगावाही नाही कारण त्यांना धर्माचे हे अंग ज्ञात नाही. त्यांना केवळ निरर्थक कर्मकांड माहीत आहे आणि आपल्या मठातले रोजचे आन्हिक तंतोतंत पाळणे हाच त्यांच्यासाठी धर्म आहे. त्यांना धर्माचा खरा अर्थ कळणारच नाही.

Leave a Comment