पाटणची राणी की बाव जागतिक वारसा यादीत

ranikivav
गुजराथच्या पाटण येथे असलेली रानी की बाव जागतिक वारसा यादीत सामील झाल्याची घोषणा युनेस्कोने कतार येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या ३८ व्या सत्रात केली आहे.

राजा भीमदेव याच्या स्मरणार्थ त्याची राणी उदयमती हिने १०२२ ते १०६३ या काळात बांधलेली ही सातमजली विहीर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. तसेच आधुनिक अभियांत्रिकी क्षेत्रासाठीही ती अभ्यासाचा विषय बनली आहे. त्याकाळी भूमिगत पाण्याचा करण्यात आलेला उपयोग हे या विहीरीचे खास वैशिष्ठ आहे तसेच त्याकाळातील तांत्रिक विकासाचे ते उत्तम उदाहरणही मानले जाते.

सोळंखी वंशाचा संस्थापक राजा भीमदेव हा वडनागरचा राजा. त्याची पत्नी उदयमती हिने ही सात मजली विहीर राजावरील प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधली. ६४ मीटर लांब, २० मीटर रूंद आणि २७ मीटर खोल अशा या विहीरीला अनेक पायर्‍या आहेत. कोरीव दगडाचे खांब आणि एकूणच बांधकामातील नेटकेपण आवर्जून पाहण्यासारखे. या विहीरीत सरस्वती नदीचे पाणी येते असे मानले जाते. प्रत्येक मजल्यावरील आधार देणार्‍या खांबांवर राम, वामन, महिषासूर मर्दिनी, कल्की अशी उत्कृष्ट शिल्पे कोरली गेली आहेत. ती सर्व भगवान विष्णूना समर्पित आहेत. सात मजल्यापैकी सध्या या विहीरीचे पाच मजले जतन केले गेले आहेत.

या विहीरीत एक छोटे दार आहे आणि त्यातून ३० किमीचे भूयार काढले गेले आहे.शत्रूचा हल्ला राजमहालावर झालाच तर या भूयारातून राजवंश आणि सैनिकांना स्वतःची सुटका करून घेता येत असे. हे भुयार आता बंद केले गेले आहे. पाटण ही गुजराथची राजधानी होती आणि या शहराचे संदर्भ महाभारतातही सापडतात. येथेच भीमाने हिडींब राक्षसाचा वध करून त्याची बहिण हिडिंबा हिच्याशी विवाह केला होता असे सांगितले जाते.

युनेस्कोच्या पथकाने गेल्या वर्षी या ठिकाणचा दौरा करून ही वैशिष्ठपूर्ण बाव पाहिली होती व त्यानंतर तिची जागतिक वारसा स्थळात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment