धोनीविरोधात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अटक वॉरंट

dhoni
अनंतपूर – भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याविरोधात आंध्र प्रदेश येथील अनंतपूरमधल्या एका स्थानिक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अटक वॉरंट काढले आहे.

आतापर्यंत तीन वेळा न्यायालयाने धोनीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, तरी एकदा सुद्धा धोनीने समन्सचे पालन केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. महेंद्रसिंह धोनी याला १६ जुलैच्या सुनावणीच्यावेळी कोर्टात हजर करा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.

बिझनेस टुडे या साप्ताहिकाने एप्रिल २०१३ मध्ये धोनीचे कव्हरपेज केले होते. धोनीला या कव्हरपेजवर विष्णूच्या रुपात दाखवण्यात आले होते. धोनीच्या अनेक हातांमध्ये विविध प्रॉडक्ट दाखवण्यात आली होती. धोनी ज्या प्रॉडक्टची जाहिरात करतो अशाच प्रॉडक्टचा कव्हरपेजच्या फोटोत समावेश करण्यात आला होता. हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या श्याम सुंदर यांनी कोर्टात धाव घेतली. केसच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने वारंवार धोनीला समन्स बजावले मात्र सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. धोनी विरोधात कव्हरपेज प्रकरणात दिल्ली, पुण्यासह देशातील अन्य शहरांमध्येही केस दाखल झाली आहे.

Leave a Comment