आला पावसाळा, सांभाळा आपल्या बाळा

kids
तप्त उन्हाळ्यानंतर आलेला पावसाळा सर्वांना सुखदायी वाटत असतो, कारण उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या जीवाला पावसासोबत येणारे थंड वारे सुखावत असतात. परंतु ही सुखदायी अनुभूती काही वेळापुरतीच असते. पावसासोबत येणारे थंड वारे कायम अल्हाददायक वाटत नाही. कारण हे थंड वारे भरपूर आर्द्रता आणि ओलावा घेऊन येत असतात आणि ओलाव्याने काही आजारांनाही निमंत्रण मिळत असते. म्हणूनच आपल्याकडे असे म्हणण्याची पद्धत आहे की, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तीन ऋतूमध्ये हिवाळा सर्वात छान असतो.

हिवाळ्यातला जिव्हाळा फार सुखदायी असतो, गुलाबी थंडीने भूक वाढते पण पावसाळा मात्र रोगी असतो. पावसाची बरसात सुखद वाटली तरी तिच्याबरोबर काही पथ्ये पाळावी लागतात, अन्यथा पोटदुखी, सर्दी, संसर्ग आणि हगवण अशा आजारांना निमंत्रण दिले जाते. पावसाळ्यात सर्वाधिक सांभाळावे लागते ते साठलेल्या पाण्याला. आपल्या घराच्या आसपास पाणी साठत असेल तर ते न साठता वाहते कसे राहील हे पहावे लागते. अन्यथा साठलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. डास आपल्यासाठी काय काय घेऊन येतात हे आपल्याला माहीतच आहे.

लहान मुलांना तर या आर्द्रतेमुळे ऍलर्जीचे त्रास होऊ शकतात. त्वचेवर चरे उमटणे आणि फंगल इन्फेक्शन या गोष्टी तर लहान मुलांच्या बाबतीत फार हमखास होत असतात. त्यावर एक उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब का होईना पण निम ऑईल वापरावे. लहान मुलांना जेवणापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी तसे जेवणानंतर साबण लावून हात धुण्याची सवय लावावी.

लहान मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पावसाळ्यात त्याला ताजे आणि गरम अन्न खायला द्यावे. शिळे किंवा थंड अन्न या ऋतूत पचत नाही आणि पोटाचे विकार बळावतात. या काळात मुलांना फळांचे रस पाजले जात असतील तर त्यात वापरला जाणारा बर्फ स्वच्छ पाण्यापासून केलेला आहे की नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण वरून टाकला जाणारा हा बर्फ कुठल्या तरी अस्वच्छ पाण्यापासून बनविलेला असतो.

लहान बाळांना या काळात उकळून थंड केलेलेच पाणी पाजावे. मूल अंगावर पिणारे असेल तर या काळात त्याचे पिणे तोडू नये, कारण याच काळात त्याला आईच्या दुधातून मिळणार्‍या प्रतिजैविकांची गरज असते. या काळात लहान मुलांना थोडेसे सैल आणि सुती कपडे घालावेत. त्याचे शरीर पूर्ण झाकले जाईल याची दक्षता घ्यावी, त्यामुळे डासांचा उपद्रव होत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment