शरीफ यांना सतावतेय बंडाची भीती

kadri
इस्लामाबाद – पाकिस्तानचे लोकप्रिय धार्मिक नेते ताहिर उल कादरी यांचा उपयोग करून देशात लष्कर बंड पुकारेल आणि आपले सरकार कोणत्याही क्षणी उलथवून टाकले जाईल अशी भीती पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना घेरून राहिली आहे. याच कारणास्तव कादरी ज्या विमानातून आले ते विमान इस्लामाबाद विमानतळावर उतरवू दिले गेले नाही आणि ते लाहोर विमानतळाकडे पाठविले गेले असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात कादरी यांनी लाहोर विमानतळावर विमानातून उतरण्यास नकार दिल्याने शरीफ सरकार समोरचा पेच वाढला आहे.

इस्लामाबादेत कादरी समर्थक आणि पोलिस यांच्याच चकमकी झाल्याने कादरी यांचे विमान वळविले गेल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विमानतळावर जमलेल्या समर्थकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला गेला आणि पोलिसांनी या भागातील मोबाईल सेवा बंद केली तसेच रस्त्यावर कंटेनर लावून रस्ते ब्लॉक केले असे समर्थकांचे म्हणणे आहे. गेल्याच आठवड्यात कादरी समर्थक आणि पोलिस याच्यातील चकमकीत ८ नागरिक व १ पोलिस ठार झाले होते.

पाकिस्तानात अचानकच परतलेल्या कादरी यांनी आपण सरकार विरोधात क्रांतीसाठी तयार असल्याची घोषणा केली आहे. तालिबानविरोधात फतवा जारी केल्याने ते पाकिस्तानात खूपच लोकप्रिय झाले आहेत मात्र कादरी यांना पुढे करून पाकचे लष्करच आपल्याविरोधात उठाव करेल या भीतीने शरीफ हैराण झाले आहेत असे अंतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Leave a Comment