उत्तर बगदाद प्रांतातील बैजी या मुख्य तेल रिफारनरीवर सुन्नी बंडखोरांनी कब्जा मिळविला असल्याचे वृत्त आहे. गेले दहा दिवस ही रिफायनरी बंडखोरांच्या ताब्यात असून बंडखोरांना हटविण्याचे इराकी सैन्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.
बैजी मुख्य रिफायनरीवर सुन्नी बंडखोरांचा कब्जा
इराकमध्ये होत असलेल्या एकूण तेल उत्पादनातील एक तृतीयांश भाग या रिफायनरीतून शुद्ध केला जातो. ही रिफायनरी बंडखोरांच्या ताब्यात गेल्याने इंधन संकट अधिक गहिरे झाले असल्याचे सांगितले जात आहे. आयएसआयएस संघटनेने उत्तर पश्चिम बगदादच्या मोठ्या भागावर यापूर्वीच ताबा मिळविला आहे. इराकमधील दोन नंबरचे शहर असलेल्या मोसूलवरही त्यांचाच ताबा आहे. त्याचबरोबर सिरीया आणि जॉर्डन ला जोडणार्या भागावरही बंडखोर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत असे सांगितले जात आहे.
कब्जा केलेल्या भागातील इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मुख्य रिफायनरीवर ताबा मिळविणे गरजेचेच होते असे बंडखोरांच्या प्रवक्त्याने जाहीर केले असून या रिफायनरीवर स्थानिक लोकांचे नियंत्रण यापुढे राहील असेही जाहीर केले आहे.