जेष्ठांच्या मदतीला धावणार हेल्पलाईन

senior-citizen
मुंबई – मुलांचा दुर्लक्षितपणा, सुना व नातवंडाकडून होणारा अपमान, यामुळे आयुष्यालाच वैतागलेल्या आणि आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणार्‍या वृद्धांना अर्थात जेष्ठ नागरिकांना सावरण्यासाठी एक ‘हेल्पलाईन’ मदतीला धावून आली आहे.

आजकाल जेष्ठ नागरिकांमध्ये बर्‍याच ठिकाणी एकाकीपणाची भावना जागृत होते आहे. इतके वर्षे आपण खस्ता खाऊन हे घरकूल तयार केले. आपल्या पिल्लांना भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ दिले आणि आता आपल्या उतार वयात या पिल्लांना आपल्यासाठी वेळ नाही, या भावनेने जेष्ठ नागरिक कोमेजले आहेत. घरात मुलं -सुना , नातवंडे आहेत अगदी घरात गोकूळ नांदते आहे. पण या गोकू ळाच्या मोठया सदस्यांना अडगळीत टाकल्या सारखे केले आहे अशी भावना मनात आल्याने मुंबईत अनेक जेष्ठ नागरिक वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत आहे.

‘घरात सर्व सुख सोई आहेत, पण मुले नातवंड बोलत नाहीत, मी घरात एकटा आहे , नैराश्य आले आहे… असा फोन ‘समॅरिटनस्’च्या हेल्पलाईनवर अलिकडेच आला आहे. या वैफल्यग्रस्त नागरिकांना स्वयंसेवकांनी भावनिक आधार दिल्यामुळे या जेष्ठांचे समाधान होत आहे. या संस्थेचे ३५ स्वयंसेवक सध्या विनामोबदला मुंबईच्या जेष्ठ नागरिकांना भावनिक आधार देत आहे. त्यासाठी त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. या हेल्पलाईनवर १७ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते ८० वर्षाच्या जेष्ठ नागरिकांचे मदतीसाठी फोन येतात.

मुंबईत रोज तीन ते चार वैफल्यग्रस्त आत्महत्या करतात. पण संस्थेचे सहायक निर्देशक मनोहर रांगणेकर यांच्या म्हणण्यानुसार, एका क्षणात असा निर्णय कोणीच घेत नाही. पहिले ताण , उदासीनता आणि मग नैराश्य येते. आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी तिच्या वागण्यात बदल होत असतात. ती कमी बोलते, शुन्यात नजर लावून बसते. एक एक पायरी चढून आत्महत्येला प्रवृत्त होतात, त्यामुळे या व्यक्तींना भावनिक आधार देण्याची गरज असते.

गेली एकवीस वर्षे ही संस्था हे कार्य करीत असल्याने अनेक लोकांकडे या हेल्पलाईनचा नंबर आहे. प्रत्येकाचे प्रश्‍न ,समस्या वेगळया असतात, फोन करणार्‍यां प्रत्येकालाच नैराश्य आलेले असते. पण परिस्थिती बाहेर जाण्याआधीच बोलून,समजावून सावरण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. ‘समॅरिटनस्’ हेल्पलाईन क्रमांकः ६५६५३२६७ किंवा ३२४७३२६७

Leave a Comment