खरीप हंगाम गेला…

kharip
जून महिना संपत आला, आठवडाभरात तो संपून जाईल. जून महिना आल्यापासून शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू केली होती, पण पावसाने निराशा केली आहे. अद्याप पावसाचा पत्ता नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला मोसमी पावसाच्या आगमनाचे वेध लागले होते. अंदमान बेटावर पाऊस सुरू झाला होता, केरळात त्याची चाहूल लागली होती आणि जूनचा पहिला आठवडा संपता संपता महाराष्ट्रात मृगाची बरसात सुरू होणार अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु या सार्‍या अनुकूल वातावरणाला नेमके काय झाले कळले नाही. मुंबईत तर मृगाची बरसात सुरूही झाली होती, ती मुंबईतच थांबली. मुंबईच्याही पुढे सरकली नाही आणि मुंबईत सुद्धा तिला गती मिळाली नाही. एकंदरीत जून महिना संपत आला तरी महाराष्ट्रात पावसाची चिन्हे नाहीत आणि हवामान खात्याने तर आता जुलैच्या पहिल्या आठवड्याचा वायदा केला आहे. पाच जुलैला पावसाला सुरू होईल असे हवामान खात्याने जाहीर केले आहे. महाराष्ट्रात खरीपाच्या पेरण्यांना आता फारच उशीर झाला आहे. पाऊस फार लहरी झाल्यामुळे मृग नक्षत्रातली पेरणी तर आपण विसरूनच गेलो आहोत. गेल्या काही वर्षांपासून उशीराची पेरणी व्हायला लागली आहे. ती सुद्धा चालते.

खरे म्हणजे उशिराच्या पेरणीने खरीप हंगाम साधतो, मात्र ती उशिरा झाल्यामुळे खरीपाचे पीक उशिरा निघते आणि दुसरे पीक घेता येत नाही. शिवाय उशिरा पेरणी झाल्यामुळे खरीपाच्या पिकाचा सुद्धा उतारा म्हणावा तसा येत नाही. परंतु उशिरा पेरणीने कसा का होईना हंमाग साधतो. असा उशीर झाल्यास कोणती पिके घ्यावीत आणि काय दक्षता घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन अलीकडे व्हायला लागले आहे. थोडा उशिराने कापूस लावला तर फार नुकसान होत नाही. जूनच्या शेवटापर्यंत सोयाबीन पेरले तर ते येते. मात्र आता पाऊस एवढा उशिरा सुरू झाला आहे की, खरीपाचा हंगाम पूर्णच गेला आहे. हवामान खाते पाच जुलैला पाऊस येईल असा अंदाज व्यक्त करत आहे. मात्र तोही अंदाज चुकला तर १५ जुलैपर्यंत पावसाची वाट बघावी लागणार आहे. तसे झाल्यास खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेलेला असेल. गतवर्र्षीे याच काळामध्ये खरीपाच्या ७० ते ८० टक्के पेरण्या झाल्या होत्या. पण या वर्षी कृषी खात्याने दिलेल्या अहवालानुसार केवळ दोन टक्के पेरण्या उरकल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचा यंदाचा खरीप हंगाम गेलेला आहे. अशा अवस्थेत शासनाला दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावीच लागते, अन्यथा हे शेतकरी शहरांकडे स्थलांतर करतात आणि तिथे त्यांची गर्दी वाढते.

शहरात निदान पोटाला अन्न तरी मिळते, म्हणून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर शहरांकडे धाव घ्यायला लागतात. हे रोखायचे असेल तर खेड्यांमध्ये शेतकरी जगवला पाहिजे. नुकतेच महाराष्ट्रावर गारपीट आणि अवकाळी पावसाचे संकट येऊन गेले. त्यामुळे शेतकर्‍यांची अतोनात हानी झाली. त्या संकटात शासनाला शेतकर्‍यांसाठी ३५०० कोटी रुपये मदत करावी लागली. त्यापूर्वीच्या वर्षी दुष्काळ निवारणावर ५५०० कोटी रुपये खर्च झाला होता. आता दुष्काळ पडल्यामुळे नव्याने मदत करावी लागणार आहे आणि या मदतीचा मोठा भार राज्य शासनावर पडणार आहे. त्याला केंद्राकडून काही प्रमाणात मदत मिळेल. परंतु मोठा हिस्सा राज्याला स्वत:ला उभा करावा लागेल. राज्य शासनाच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार पडणार आहे. केंद्राकडून मदत घेऊन राज्य सरकार काही प्रमाणात शेतकर्‍यांना दिलासा देईल. परंतु ही मदत शेतकर्‍यांना फार उशिराही मिळत असते. तसा तिचा फार प्रत्यक्ष फायदा होत नाही आणि शेतकर्‍यांचेही या काळातली अडचण एवढी तीव्र असते की, सरकारच्या मदतीने त्याला फार मोठा दिलासा मिळू शकत नाही. जनावरांचा चारा आणि वापरावयाचे पाणी यामुळे शेतकर्‍यांचे फार हाल होतात. आताच महाराष्ट्रामध्ये पाच हजारांवर गावे आणि पाड्यांवर टँकरने पाणी पुरवले जात आहे.

पाऊस उशिरा पडला तर हे संकट अधिक गहिरे होऊन राज्यातल्या मोठ्या ग्रामीण भागाला टँकरचा पाणी पुरवठा करावा लागणार आहे. शहरांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना कितीही अडचणीत आल्या तरी दोन दिवसाआड किंवा चार दिवसाआड असे पाणी पुरवले जाते. कारण शहरांचे पाणी अजिबातच बंद झाले तर संघटित शहरवासीय लोक आरडाओरडा करतात. तेव्हा मुंबई-पुण्यासारख्या शहरामध्ये काही टक्के पाणी कपात करून संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला जातो, खेड्यात मात्र फार हाल होतात. सध्या दुष्काळाच्या वातावरणात खेड्यातले लोक अन्नासाठी त्रस्त होत नाहीत. कोठूनही धान्य आणून त्याची गरज भागवता येते, दुष्काळ जाणवतो तो पाण्याचा आणि चार्‍याचा. शेतकर्‍यांना शेतामध्ये मशागत करण्याकरिता जनावरे तर लागतातच, पण एखादे जनावर पाळणे म्हणजे काय असते हे तो शेतकरीच जाणे. त्याची चार्‍याची आणि पाण्याची गरज माणसासारखीच असते. ती जर पूर्ण करता आली नाही तर शेतकरी मोठा निराश होतो आणि नाईलाजाने आपल्या जनावरे दावे खाटकाच्या हाती देतो. त्याच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग फार जीवघेणा आणि करूण असतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून शेतीची अवस्था फार वाईट झाली आहे. सतत दुष्काळाचे चटके जाणवत आहेत, निसर्गाची साथ मिळत नाही. भारताच्या शेती व्यवसायाला एक क्रांतीकारक वळण मिळण्याची गरज आहे.

Leave a Comment