महिला तुरूंगात उतरला हॉट एअर बलून

hotb
ओरेगॉन- अमेरिकेतील ओरेगॉनच्या महिला तुरूंगात अचानकच एक हॉट एअर बलून उतरल्याने एकच गोंधळ माजला. कामासाठी बाहेर काढण्यात आलेल्या महिला कैद्यांना तातडीने पुन्हा कोठड्यात बंदिस्त करण्याची एकच धावपळ उडाली तसेच हा बलून म्हणजे महिला कैद्यांकडून पलायन करण्याचा डाव नसेल ना या शंकेने तुरूंग व्यवस्थापक चिंतीत झाले. मात्र तसा कोणताही प्रकार नसून हा केवळ अपघात होता असे स्पष्ट झाल्यानंतर वातावरण निवळले.

त्याचे झाले असे की कॉफी क्रिक करेक्शनल फॅसिलीटीच्या आवारात हॉट एअर बलून फेस्टीव्हल सुरू असून हा रस्ता चुकलेला बलून त्या फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाला होता. मात्र इंधन संपत आल्याने आणि जोरदार वार्‍यांमुळे तो भरकटला. मग बलूनच्या पायलटने तातडीचा निर्णय घेऊन या तुरूंगाच्या रिक्रिएशन यार्डमधील मैदानात सुरक्षित राहण्यासाठी तो उतरविण्याचा निर्णय घेतला आणि उतरविलाही. यात कोणीही जखमी झाले नाही मात्र तुरूंगाबाहेर रिक्रिएशन हॉलमध्ये काम करत असलेल्या महिला कैद्यांना तातडीने कोठडीत रवाना करण्यात आले.

बलून बाहेर काढण्यासाठी अर्धा तास लागला व त्यानंतच पुन्हा महिला कैद्यांना बाहेर काढले गेले. अर्थात जेथे बलून उतरला ती जागा मुख्य तुरूंगापासून दूर असल्याने महिला कैद्यांच्या सुटकेसाठीचा हा प्रयत्न नव्हता याची खात्री पटल्याचे तुरूंग प्रवक्ती व्हिकी रेनॉल्ड हिने सांगितले.