पोर्तुगल-अमेरिका लढत बरोबरीत

amerika

मानॉस – फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पोर्तुगल-अमेरिका लढत ही शेवटपर्यंत रोमांचकारी ठरली. हा सामना संपण्यासाठी शेवटची काही मिनिटे बाकी असताना, अमेरिका आघाडीवर होती. अमेरिका हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच,बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या व्हॅरेलाने पोर्तुगालसाठी निर्णायक ठरणारा दुसरा गोल केला,अन हा सामना बरोबरीत सुटला.

ग्रुप जी मध्ये पोर्तुगालला अमेरिके विरुध्दचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवता आला. व्हॅरेलाच्या गोलने पोर्तुगालला सलग दुस-या पराभवापासून आणि विश्वचषकाच्या साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येण्यापासून वाचवले. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटातच पोर्तुगालने आपले खाते उघडले. अमेरिकेचा बचावरक्षक जिऑफ कॅमरॉनने केलेल्या चुकीचा फायदा उचलत नॅनीने चेंडूला गोल जाळयाची दिशा दाखवत पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात अमेरिकेने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला मात्र पोर्तुगालच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. मध्यंतरानंतर सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला जेर्मेनी जोसने मैदानी गोल करत अमेरिकेला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ८१ व्या मिनिटाला डेम्पेसीने दुसरा गोल करत अमेरिकेला २-१ने आघाडी मिळवून दिली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये व्हॅरेलाने रोनाल्डोच्या क्रॉस पासवर हेडरव्दारे गोल करत पोर्तुगालला २-२ अशी बरोबरी साधून दिली. पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले नसले तरी, मार्ग खडतर बनला आहे. ग्रुप जी मध्ये जर्मनीपाठोपाठ अमेरिका दुस-या स्थानावर आहे. पोर्तुगालचे गोल करण्याचे प्रयत्न निष्फळ करणारा अमेरिकेचा गोलरक्षक होर्वाडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पोर्तुगालला पहिल्या सामन्यात जर्मनीकडून ४-० असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.

Leave a Comment