ग्राहक पंचायतीचे रेल्वे दरवाढीला कोर्टात आव्हान

rel
मुंबई – मुंबई ग्राहक पंचायत तसेच माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी दरवाढीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रेल्वेने ग्राहकांवर लादलेली अवास्तव भाडेवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी विनंती या जनहित याचिकांद्वारे करण्यात आली असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

पहिली याचिका मुंबई ग्राहक पंचायतीचे शिरिष देशपांडे यांनी दाखल केली असून, त्यात मासिक पासांच्या दरवाढीकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. उपनगरीय लोकल गाड्यांमधून फिरणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे मासिक पाससाठी तब्बल १८० टक्के जादा भुर्दंड पडणार आहे. ते पाहता या अन्याय्य भाडेवाढीतून ग्राहकांची मुक्तता करण्यात यावी वा या भाडेवाढीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आम्ही याचिकेत केली आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

दुसरी याचिका केतन तिरोडकर यांनी केली असून त्यांनीही मुंबईतील चाकरमान्यांवर पडणाऱ्या आर्थिक बोजावर बोट ठेवले आहे. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावर दररोज सुमारे ७० लाख प्रवासी प्रवास करतात. या मध्यमवर्गीयांचे रेल्वे दरवाढीने कंबरडेच मोडणार असून ही दरवाढ मागे घेऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

Leave a Comment