मुंबई – महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांना कारवाई करण्यापासून रोखणाऱया कॅम्पाकोलावासियांनी आज मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्यावर मात्र सदनिकेच्या चाव्या बीएमसीच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे.
सदनिका सोडण्यास कॅम्पाकोलावासीय तयार
मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि कॅम्पाकोलातील रहिवासी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रहिवासी सदनिका सोडायला तयार नव्हते. गेल्या तीन दिवसांपासून बीएमसीचे अधिकारी कॅम्पाकोला सोसायटीवर कारवाई करण्याच्या उद्देशाने येत असत. मात्र, रहिवाशांच्या तीव्र विरोधापुढे कारवाई करणे त्यांना शक्य होत नसे. शेवटी आज बीएमसीने पोलीसांची मदत घेऊन रहिवाशांना बाहेर काढण्याचे ठरविले. यावेळी नांदगावकर यांनी बीएमसीचे अधिकारी व रहिवाशांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली.
मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीनंतर रहिवाशांनी सदनिकेच्या चाव्या बीएमसी अधिकाऱयांकडे सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, रहिवाशांनी आज संध्याकाळी कारवाई न करता उद्यापर्यंतचा वेळ बीएमसी अधिकाऱयांकडे मागितला आहे.