लूट नक्कीच टाळता येईल

vegsell
शेतकरी हा नेहमीच लुटला जात असतो. वर्षानुवर्षे तो ही लूट सहन करीत आला आहे. ती असह्य झाली तेव्हा त्याने काही प्रमाणात आक्रोशही केलेला आहे पण त्यावर स्वत:च काही उपाय योजण्याबाबत ङ्गार कमी शेतकर्‍यांनी पावले टाकली आहेत. शेतीमाल विकताना दलाल, आडत्ये आणि मध्यस्थ व्यापारी शेतकर्‍यांची नाडणूक करतात. भाजीच्या बाजारात तर याचा ङ्गारच विदारक अनुभव येतो. शेतकरी आपला माल ङ्गुकापासरी विकून जातात आणि नंतर व्यापारी त्या मालाची विक्री चढ्या भावाने करतात. त्या मालाच्या उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी घाम गाळलेला असतो पण त्याच्यापेक्षा या व्यापार्‍यांनाच जास्त पैसा मिळतो. यावर उपाय म्हणजे शेतकर्‍यांनी स्वत:च आपल्या मालाची विक्री करणे. भाजीच्या बाबतीत तरी हे नक्कीच करता येते. कारण भाजी विकत बसायला काही परवाना लागत नाही. त्याला काही दुकान थाटावे लागत नाही. असा ङ्गायदा दिसत असूनही शेतकरी तशी विक्री करू शकत नाहीत कारण त्याला शेतात जायचे असते. पण हे काही सर्वस्वी खरे नाही.

नाही तरी आपण आपली भाजी आडतीवर विकली तरी मापे होऊन पट्टी मिळेपर्यंत आणि नंतर चहा पाणी करेपर्यंत घरी जायला १० वाजतातच. मग दहा वाजेपर्यंत आपली भाजी आपण विकत बसलेले काय वाईट? चार पैसे जास्त मिळतात. समजा दहा वाजेपर्यंत सगळा माल विकला गेला नाही तरी काही बिघडत नाही. थोडा बहुत उरलेला माल एखाद्या व्यापार्‍याला विकून टाकावा. जेवढा माल आपण विकला असेल तेवढ्यात तरी आपल्याला खूप जास्त पैसा मिळालेला असतो. ज्याच्या शेतात भाजीपाला कमी असेल अशा शेतकर्‍यांना अशी स्वत:ची विक्री नक्कीच करता येईल. त्यासाठी आता जवळपासच्या मोठ्या गावालाही जाण्याची गरज राहिलेली नाही. खेड्यातही लोक भाजी विकत घेऊन खायला लागले आहेत. आपल्याच गावात बरीचशी भाजी विकता येत आहे. आपण आपल्या पातळीवर थोड्या बहुत प्रमाणात का होईना आपली शोषणातून मुक्तता करू शकतो. हा प्रयोग तसा काही नवा नाही. ग्रामीण भागातल्या आठवड्याच्या बाजारांत असे अनेक शेतकरी आपला माल विकायला आणतात. स्वत: विकत बसतात. शेतीमाल विकण्याच्या आजच्या प्रचलित लुटारू पद्धतीपेक्षा या स्वावलंबी पद्धतीत चार पैसे जास्त मिळतात असा अनुभव आहे.

अशी विक्री करणे छोट्या शेतकर्‍यांना शक्य आहे. मोठ्या शेतकर्‍यांनी काय करावे ? त्यांनी शेताकडे लक्ष द्यावे की विक्री करीत बसावे ? शिवाय एखाद्या भाजी विक्रेत्या प्रमाणे भाजी विकत बसलो तर थोडा माल विकला जाईल. मोठ्या शेतकर्‍यांचा माल तर खूप असतो. तो कसा विकावा ? असा काहींचा प्रश्‍न आहे. प्रश्‍न बरोबर आहे. प्रश्‍न बरोबर आहे याचा अर्थ त्याला उत्तर नाही असे नाही. पण ते उत्तर स्वत: शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या शेतकर्‍याने सगळा नाही पण आपल्याला शक्य होईल तेवढा माल तरी स्वत: विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहान शेतकरी लहान प्रमाणात विकत बसतो तसे न बसता मोठ्या शेतकर्‍यांनी आपला माल थेट ग्राहकांना न विकता थेट छोट्या विक्रेत्यांना स्वत: विकावा. विक्रीतल्या साखळीतल्या आडत्या आणि ठोक विक्रेते या दोन मध्यस्थांना तर आपण नक्कीच सुटी देऊ शकतो. त्याचा काही ना काही ङ्गायदा अशा शेतकर्‍यांना होतोच. अशीही विक्री करणारे काही मोठे शेतकरी आहेत. सध्या पुण्यात काही शेतकरी आपल्या भाज्या मोठ्या हाउसिंग सोसायट्यात थेट जाऊन विकायला लागले आहेत. सोसायट्यात घरेही खूप असतात. या पद्धतीत भाज्या ताज्या मिळतात. ग्राहकांना भाजी नेहमीपेक्षा स्वस्त मिळते आणि शेतकर्‍यांना चार पैसे जास्त मिळतात.

असा उपक्रम केवळ पुण्यातच चालू शकतो असे नाही. औरंगाबाद, अमरावती, नागपूर, ठाणे, नांदेड, लातूर, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, अशी महाराष्ट्रात कितीतरी शहरे आहेत. तिथे हा प्रयोग करायला काही हरकत नाही. शिवाय काही मोठ्या भाजीपाला उत्पादकांना काही वसतिगृहे, मोठी हॉटेल्स आणि ढाब्यांवर भाजी पुरवठा करून थेट ग्राहक गाठता येईल. त्यासाठी गावातल्या तिघा चौघांचा ग्रुप करता येईल. त्यामुळे विक्रीच्या कामावर एकजण गुंतला तर इतर लोकांचा शेतातल्या कामांचा खोळंबाही होणार नाही. सगळ्यांचीच सगळीच भाजी अशी विकली जाईल असे नाही. काही प्रमाणात प्रचलित पद्धत सुरूच राहील पण थेट विक्रीच्या पद्धतीचा दबाव या बाजारावर पडून तिथे जाणार्‍या शेतकर्‍यांना चांगला भाव मिळू शकेल.

सध्या बाजारात भाजीपाला खूप महाग झाला आहे आणि लोक त्यामुळे त्रस्त झालेले आहेत. भाजीपाल्याला खूप पैसे मोजावे लागतात आणि त्यातला बराचसा पैसा शेतकर्‍यांना मिळतो, असा ग्राहकांचा समज असतो. त्यामुळे काही ग्राहक भाज्यांच्या किंमती बघून शेतकर्‍यांच्या नावाने बोटे मोडायला लागतात. काही ग्राहक मनातल्या मनात, शेतकर्‍यांची मजाय बाबा असे म्हणत असतात. परंतु आपण भाज्यांसाठी जो भरमसाठ पैसा मोजत असतो त्यातला ङ्गार कमी पैसा शेतकर्‍यांना मिळतो आणि शेतकर्‍यांपेक्षा जास्त पैसा मधल्या दलालांना मिळत असतो हे त्यांना माहीत नसते. दलालांचे उच्चाटन केले तर शेतकर्‍यांनाही चार पैसे जास्त मिळू शकतात आणि ग्राहकांनाही भाजीपाला स्वस्त मिळू शकतो. पण त्यासाठी उपक्रमशील शेतकर्‍यांची गरज आहे. या शेतकर्‍यांनी स्वत:चा भाजीपाला स्वत: ग्राहकांपर्यंत नेऊन विकला पाहिजे.

या संबंधात अनेक शेतकर्‍यांंशी बोलणे झाले, परंतु असे शेतकरी असा उपक्रम राबवणे शक्यच नाही, आम्ही भाजीपाला विकत बसल्यास शेतातली कामे कोण करणार? असे नाना प्रकारचे बहाणे सांगत असतात. परंतु या अडचणींवर मात करून सुद्धा स्वत:चा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत नेऊन विकला तर शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन येऊ शकते. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकर्‍यांनी असा उपक्रम यशस्वीरित्या राबवलेला आहे. जुन्नर तालुक्यातल्या काळेवाडी गावचे सुनील वामन यांनी या बाबतीत पुढाकार घेतला असून ते आपल्या गावाच्या परिसरातील शेतकर्‍यांचा भाजीपाला पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात स्वत: बसून विकत आहेत. त्यांना त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक शेड दिलेले आहे. त्यात त्यांच्या सोबत या भागातले सहा शेतकरी स्वत: राबत असतात आणि भाजीच्या व्यापार्‍यांपेक्षा कमी दरामध्ये ग्राहकांना थेट भाज्या विकत असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्राहक सुद्धा खूप खूश आहेत. कारण एकंदर सारा चाखाचोळा घेतला असता या उपक्रमामुळे ग्राहकांना किलोमागे पाच ते दहा रुपये एवढी स्वस्त भाजी मिळते, असे दिसून आले आहे. ग्राहकांना स्वस्त भाजी देऊन सुद्धा शेतकर्‍यांना नेहमीपेक्षा जास्त ङ्गायदा होत आहे. याही शेतकर्‍यांसमोर शेतातली कामे कोणी करावीत, असा प्रश्‍न पडला होताच. परंतु त्यावर त्यांनी मात केली आहे.

त्यासाठी शेतकर्‍यांची सहा मुले केवळ भाजीपाला गोळा करण्यावर नेमलेले आहेत. सहा विक्री करणारे आणि सहा संकलन करणारे असे बारा तरुण या उद्योगाला लागलेले आहेत. त्यातून ११० शेतकर्‍यांच्या भाज्या विकल्या गेल्या असून दररोजची सरासरी विक्री १६ हजार रुपये एवढी आहे. हे शेतकरी आपल्या शेतातला भाजीपाला जुन्नर येथे एकत्र करतात आणि तो पुण्यापर्यंत नेण्याची जबाबदारी सहा जण पार पाडतात. गुलटेकडीच्या मार्केट यार्डात सुनील वामन यांच्या नेतृत्वाखाली सहा तरुण त्यांची विक्री करतात. अशा रितीने मधल्या दलालांकडून होणारी लूट टाळण्यात या शेतकर्‍यांनी यश मिळविलेले आहे. आपल्या या भाजीच्या ठेल्यावर सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळाव्यात यासाठी या शेतकर्‍यांनी विविध प्रकारच्या भाज्या लावण्याबाबत दक्षता बाळगलेली आहे. त्यामुळे या ठेल्यावर कोणती भाजी मिळत नाही, असे कधी होत नाही. अ शा प्रकारचा उपक्रम केवळ पुण्यातच का व्हावा ? नाशिकला का होऊ नये ? तो नाशिक, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नागपूर अशा सर्व ठिकाणी होऊ शकतो आणि शेतकर्‍यांना आपल्या भाजीपाल्यापोटी मिळणार्‍या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळू शकते. शिवाय बारा तरुण कामाला लागतात ते वेगळेच. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.

Leave a Comment