मोफत मिळणार नमो अँटीव्हायरस

namo
इनोव्हेझन या स्वदेशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील फर्मने आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे नामकरण नमो असे केले असून हे सॉफ्टवेअर युजरना मोफत उपलब्ध करून दिले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय झालेला शॉर्टफॉर्म नमो असा आहे. हे सॉफटवेअर संगणकाला मालवेअर आणि व्हायरस अॅटॅकपासून संरक्षण देणार आहे. सध्या या सॉफ्टवेअरचे बेसिक व्हर्जन उपलब्ध असून याचे आधुनिक व्हर्जन लवकरच लाँच केले जाणार असल्याचे कंपनीचे सीइओ अभिषेक गगनेजा यांनी सांगितले.

गगनेजा म्हणाले की आमचा राजकारणाशी कांहीही संबंध नाही. मात्र नवीन सरकारचे अभिनंदन करण्यासाठी आणि देशाच्या नागरिकांना या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत हा मेसेज देण्यासाठी नमो नाव वापरले गेले आहे. या सॉफ्टवेअरचे आधुनिक व्हर्जन अॅपल मॅक पीसीसाठीही उपयुक्त आहे तसेच बेसिक व्हर्जनही दरवेळी आपोआप अपडेट होत राहणार आहे.

भारत हा इंटरनेट युजरच्या संख्येत जगात तिसरा देश आहे. मात्र केवळ १३ टक्के युजर अधिकृत परवाना असलेले अँटीव्हायरस वापरतात. ३० टक्के युजर ट्रायल व्हर्जनचे रिइनस्टॉलेशन करतात तर ५७ टक्के लोक अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरातच नाहीत असे आढळून आले आहे. हाच सेक्शन आमच्या नमो साठी आम्ही टार्गेट केला आहे असेही गगनेजा यांनी सांगितले.

इनोव्हेझन ही कंपनी २००७ साली स्थापन करण्यात आली आहे. त्याचा विस्तार भारतासह यूएस, यूके,जर्मनी, कॅनडा, चीन, सिगापूर व रूमानिया अशा सात देशांत आहे आणि कंपनीत ५०० कर्मचारी काम करतात असेही समजते.